अमरावती, 30 जुलै – चिखलदरा तालुक्यातील नागापूर येथील वसंतराव नाईक आदिवासी आश्रमशाळेत भीषण अपघात घडला. जुनाट आणि धोकादायक स्थितीत असलेली पाण्याची टाकी अचानक कोसळल्यामुळे एका १४ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला असून, अन्य चार विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या आहेत. हा अपघात मंगळवारी, २९ जुलै रोजी घडला.
मृत विद्यार्थिनीचे नाव सुमराती सोमा जामुनकर (वय १४, इयत्ता ८ वी) असून, अपघातानंतर तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाला. चार जखमी विद्यार्थिनींवर अचलपूरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, आश्रमशाळेची पाण्याची टाकी अनेक दिवसांपासून खराब अवस्थेत होती. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही करण्यात येत आहे. ही आश्रमशाळा भाजप आमदार केवलराम काळे यांच्याशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे.
घटनेनंतर संपूर्ण मेळघाट परिसरात संतापाची लाट पसरली आहे. अमरावती विभागाचे आदिवासी अप्पर आयुक्त जितेंद्र चौधरी यांनीही या दुर्घटनेची माहिती दिली आहे.
या अपघातामुळे आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, अशा दुर्घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी सर्रास खेळ होतोय, अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.