श्रीनगर , 15 मे (हिं.स.)।भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर जम्मू आणि काश्मीर मधील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह श्रीनगरला पोहचले आहेत. यावेळी त्यांनी जवानांची भेट घेतली. पहलगाम हल्ल्यानंतर आणि १० मे रोजी दोन्ही देशांमधील युद्धविरामानंतर संरक्षणमंत्र्यांनाचा जम्मू काश्मीरमधील हा पहिलाच दौरा आहे.त्यांच्यासोबत उपराज्यपाल मनोज सिन्हा आणि लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी उपस्थित आहेत.
यावेळी राजनाथ सिंह यांनी “सैनिकांनी केलेल्या कामगिरीचा गर्व आहे. आपल्या सैन्याचा निशाणा अचूक हे जगाला माहित आहे. ऑपरेशन सिंदूर हे दहशतवादाविरोधात मोठी लढाई आहे. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारून मारले. आपण दहशतवाद्यांचे कर्म बघून त्यांचा खात्मा केला, हाच आपला धर्म आहे,” असे सांगितले. पुढे ते म्हणाले की, पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्व निष्पाप नागरिकांना आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान शहीद झालेल्या आपल्या जवानांना मी श्रद्धांजली अर्पण करतो” असं केंद्रीय संरक्षण मंत्र्यांनी म्हटलं आहे.
“मी आपल्या जखमी जवानांच्या धाडसालाही सलाम करतो आणि ते लवकर बरे व्हावेत अशी देवाकडे प्रार्थना करतो. शत्रूला नेस्तनाबूत केलं ती ऊर्जा अनुभवायला मी इथे आलो आहे. तुम्ही सीमेपलीकडे पाकिस्तानच्या चौक्या आणि बंकर ज्या परकारे उद्ध्वस्त केलं ते शत्रू कधीही विसरणार नाही. तुम्ही पाहिलं असेल की, लोक सहसा उत्साहात आपलं भान गमावतात परंतु तुम्ही तुमचा उत्साह तसाच कायम ठेवला आणि अचूक पद्धतीने शत्रूची ठिकाणं उद्ध्वस्त केली.”
“आज भारताचा दहशतवादाविरुद्धचा संकल्प किती मजबूत आहे हे आपण त्यांच्या न्यूक्लियर ब्लॅकमेलची पर्वा केलेली नाही यावरून समजलं. संपूर्ण जगाने पाहिलं आहे की पाकिस्तानने किती बेजबाबदारपणे भारताला अनेक वेळा धमकी दिली आहे” असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे