सोलापूर : वळसंगकर हॉस्पीटलचे प्रमुख डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येच्या घटनेच्या दुसर्या दिवसापासून शनिवार (ता.18) पासून या रुग्णालयामधील बाह्यरुग्ण तपासणी विभाग बंद आहे. बाह्यरुग्णांसह दाखल रुग्णांवर उपचार करणार्या डॉ. अश्विन आणि डॉ. शोनाली वळसंगकर या दोघांच्या सदर बझार पोलिस ठाणे तसेच कायदे तज्ज्ञांकडे चकरा सुरु आहेत. शिवाय डॉ. शिरीष वळसंगकरांच्या आत्महत्येनंतर नातेवाईक, हितचिंतक, मित्र परिवार आदींजण सांत्वनपर भेटीसाठी येत आहेत.
त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे डॉ. शिरीष वळसंगकरांच्या आत्महत्येचा धक्का आणि त्यानंतर उद्भवलेली परिस्थिती, पोलीसांचा चौकशीचा ससेमिरा या एकूणच्या सगळ्या पार्श्वभूमीवर, डॉ. अश्विन आणि डॉ. शोनाली वळसंगकर हे मानसिकदृष्ट्या डिस्टर्ब आहेत, त्यामुळे रुग्णालयामधील ओपडी म्हणजे बाह्यरुग्ण विभाग बंदच ठेवण्यात आला असून साधारण महिनाभरापूर्वी हॉस्पीटलमध्ये दाखल झालेले डॉ. विरेशकुमार दूर्वे हे दाखल रुग्णांवर उपचार करीत आहेत. त्यांच्यावर या संबंधित रुग्णांची धुरा सोपविण्यात आल्याचे सांगण्यात आले.