नवी दिल्ली, 11 ऑगस्ट : केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधी खासदारांच्या बिहारमधील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकन (एसआयआर) आणि कथित ‘मत चोरी’विरोधातील संसद भवन ते निवडणूक आयोगापर्यंतच्या मोर्चावर जोरदार टीका केली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे नाव न घेता ते म्हणाले की, एका व्यक्तीच्या असंमंजसपणामुळे आणि एका कुटुंबाच्या हट्टामुळे देशाचे इतके नुकसान सहन करता येणार नाही.
रिजिजू म्हणाले, काँग्रेस आणि विरोधकांनी खूप वेळ वाया घालवला आहे. आता देश आणि संसद यांचा आणखी वेळ वाया जाऊ देणार नाही. सरकार महत्त्वाचे विधेयक मंजूर करू इच्छित आहे आणि आज लोकसभा व राज्यसभेत दोन्ही ठिकाणी महत्त्वाची विधेयके मंजूर केली जातील. अनेक विरोधी खासदारांनी स्वतः येऊन सांगितले की त्यांना जबरदस्तीने गोंधळ घालण्यास सांगितले जात आहे.
त्यांनी सांगितले की, निवडणूक आयोगाने ‘इंडिया’ आघाडीतून प्रत्येकी 2 सदस्य पाठवण्यास सांगितले होते. एकूण 30 सदस्यांना बोलावले होते, पण ते गेलेच नाहीत. आघाडी 30 सदस्य ठरवू शकली नाही. मल्लिकार्जुन खर्गे म्हणतात की सर्व विरोधी सदस्य व्हीआयपी आहेत, तर मग 150 लोक निवडणूक आयुक्तांच्या खोलीत जातील का, असा प्रश्न रिजिजू यांनी उपस्थित केला.
रिजिजू यांनी पुढे म्हटले की, इंडी आघाडीला सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग आणि संसद प्रणालीवर विश्वास नाही. ते घटनात्मक संस्थांवर सातत्याने हल्ला करत आहेत. भारताची प्रतिमा मलिन करण्यासाठी नाटक का करतात? जनतेने आपल्याला देशसेवेकरिता पाठवले आहे, नाटकासाठी नाही. आम्ही विधेयके मंजूर करणारच आणि तुम्ही चर्चेत भाग घ्या, नंतर खोटे सांगू नका की बोलू दिले नाही, असा इशारा त्यांनी दिला.
दरम्यान, बिहारमध्ये मतदार यादीचे एसआयआर आणि कथित ‘मत चोरी’विरोधात विरोधी खासदारांनी संसद भवन ते निवडणूक आयोग कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. दिल्ली पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केल्याने तणाव निर्माण झाला. नंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, प्रियंका वाड्रा, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, शिवसेना (उद्धव गट) खासदार संजय राऊत यांच्यासह अनेक विरोधी नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.