इस्लामाबाद , 14 मे (हिं.स.)।ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय लष्कराने नष्ट केलेल्या दहशतवादी तळाचे पुनर्वसन करण्याची घोषणा पाकिस्तान शाहबाज शरीफ सरकारने केली असून, या हल्ल्यात मारले गेलेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना १४ कोटी पाकिस्तानी रुपये दिले जाणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. तर जखमी दहशतवाद्यांना १० ते २० लाख रुपये दिले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताने केलेल्या कारवाईत जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर यांच्या कुटुंबातील १४ दहशतवादी ठार झाले होते. यानंतर आता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी एक धक्कादायक घोषणा केली. दहशतवाद्यांना शहीद मानून त्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत, घरांची उभारणी, मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आणि उपचाराचा खर्च सरकार उचलेल असे त्यांनी जाहीर केले. या घोषणेनुसार, मृत दहशतवाद्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी १ कोटी रुपये, जखमींना १० ते २० लाख रुपये, तसेच छावण्यांची पुनर्बांधणी करण्यासाठीही निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
याशिवाय, शाहबाज शरीफ सरकारने मारल्या गेलेल्या पाकिस्तानी जवानांच्या कुटुंबियांना १ ते १.८ कोटी रुपये, निवृत्तीच्या तारखेपर्यंत पूर्ण वेतन आणि भत्ते, मुलीच्या लग्नासाठी १० लाख रुपये, आणि घरासाठी १.९ ते ४.२ कोटी रुपये देण्याची घोषणाही केली आहे. जखमी जवानांनाही त्यांच्या दर्जानुसार २० ते ५० लाख रुपयांपर्यंत भरपाई देण्यात येणार आहे.
पाकिस्तान सरकारच्या या निर्णयामुळे जगभरात संतापाची लाट उसळली आहे. दहशतवाद्यांना ‘शहीद’ घोषित करून त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा वर्षाव करणे, आणि त्यांची अड्डे पुन्हा उभारणे, हे आंतरराष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय गंभीर बाब आहे.
शाहबाज शरीफ सरकारने ज्या पद्धतीने दहशतवाद्यांच्या कुटुंबांना मदतीचा हात पुढे केला आहे, त्यातून हे स्पष्ट होते की पाकिस्तान अजूनही दहशतवादाचा पृष्ठसंरक्षक देश म्हणूनच कार्यरत आहे. शांतता आणि दहशतवादविरोधी लढ्याचे ढोंग करणाऱ्या पाकिस्तानने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की तो अजूनही दहशतवाद्यांचा हात धरून आहे.
भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ६ आणि ७ मे च्या मध्यरात्री पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले. जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीन यांसारख्या संघटनांच्या छावण्या उद्ध्वस्त करण्यात आल्या. या ठिकाणी भारताविरोधात दहशतवादी कारवायांची आखणी सुरू होती. या हल्ल्यांमध्ये पाक लष्कराच्या ११ जवानांचा मृत्यू आणि ७८ जण जखमी झाले.