अमरावती, 10 सप्टेंबर : सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या संविधानविरोधी कारभाराच्या विरोधात युवक काँग्रेसतर्फे आज “वोट चोर गद्दी छोड” अशा घोषणांनी गगनभेदी नारे देत स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. हे अभियान डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय, अमरावती येथे आयोजित करण्यात आले.
या अभियानात शेकडो विद्यार्थी आणि युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपला रोष व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी स्वाक्षऱ्या करून लोकशाहीची पायाभरणी मजबूत करण्यासाठी आणि जनादेशाचा अपमान करणाऱ्या सत्ताधाऱ्यांविरुद्ध ठाम भूमिका घेतली.
जनतेच्या मतांचा अनादर करून सत्तेत बसलेल्या सरकारविरुद्ध युवकांचा संघर्ष सुरू असून, या स्वाक्षरी अभियानाद्वारे लोकशाहीची खरी ताकद दाखविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद पाहता, युवक काँग्रेसचे हे अभियान पुढील काही दिवस शहरातील महाविद्यालये, बाजारपेठा व सार्वजनिक ठिकाणी राबविले जाणार असल्याचे अमरावती विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष वैभव देशमुख यांनी सांगितले.
या वेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रवक्ते व अमरावती जिल्हा युवक काँग्रेसचे प्रभारी कपिल ढोके, शहर जिल्हाध्यक्ष निलेश गुहे, उपाध्यक्ष अनिकेत ढेंगळे, नितीन काळे, पंकज मांडळे, स्वप्नील साव, अक्षय साबळे, संकेत साहू, आकाश गेडाम या युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह खालील महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.