अमरावती, 20 मे, (हिं.स.)
दगडाने ठेचून युवकाची हत्या केल्यानंतर युवकांनी दिवसभर मद्यपान केले आणि सायंकाळी तिघांनी राजापेठ पोलीस ठाण्यात जाऊन हत्या केल्याची कबुली दिली. परंतु मृताचे नाव माहित नसल्याचे सांगितले. हा प्रकार ऐकून पोलिसांच्या पायाखालची वाळू सरकली. पोलिसांनी युवकांना घेऊन घटनास्थळ गाठले.
घटनास्थळ खोलापुरीगेट ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने राजापेठ पोलिसांनी सुटकेचा श्वास घेतला. खोलापुरीगेट पोलिसांनी तीन्ही युवकांना अटक व मृताची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरु केले.
सागर अडायके, विक्की सरकटे आणि निलेश सावरकर अशी अटकेतील युवकांची तर साहिल राऊत आणि नवनीत इंगोले अशी पसार युवकांची नावे आहेत.राजापेठ पोलीस ठाण्यात सायंकाळ च्या सुमारास तीन युवक दारूच्या नशेत आले आणि आम्ही पाच मित्रांनी एका युवकाची दगडाने ठेचून हत्या केल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. हे ऐकताच कर्मचाऱ्याने तिघांना ठाणेदारासमोर उभे केले असता त्यांनी तेच सांगितले. मंगळवारी शहरात नवीन पोलीस आयुक्त येत आहेत आणि आपल्या हद्दीत हत्या झाली तसेच कोणाची हत्या केली हे सुध्दा मारेकऱ्यांना माहित नाही.
त्यामुळे पोलिसांच्या पायाखालची वाळूच सरकली.त्यांनी लगेच त्या युवकांना सोबत घेतले आणि घटनास्थळावर नेले. घटनास्थळ भातकुली मार्गावरील राऊत यांचे शेत होते. संबंधित घटनास्थळ खोलापुरीगेट ठाण्याचे असल्याने त्याची माहिती खोलापुरीगेट पोलिसांना देऊन राजापेठ पोलिसांनी सुटकेचा श्वास घेतला.खोलापुरीगेट पोलीस घटनास्थळाची पाहणी केली. राऊत यांच्या शेतातील टिनाच्या शेडमध्ये २० ते २२ वर्षीय युवक मृत अवस्थेत दिसला. पोलिसांनी तपास चक्र फिरविले.
तिन्ही मारेकऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांची कसुन चौकशी केली असता मृतक कोण आहे हे माहित नाही मात्र दारुच्या नशेत पाच मित्रांनी मिळून त्याची हत्या केल्याचे सांगितले. खोलापुरीगेट पोलीस मृतकाची ओळख पटवीण्याचा प्रयत्न करीत आहेत. तपासादरम्यान मृत हा राजापेठ ठाण्याच्या हद्दितील झेंडा चौकातील रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली असून पोलीस पुढील तपास करीत आहे.