काठमांडू, 8 सप्टेंबर : नेपाळची राजधानी काठमांडू येथे आज, सोमवारी हजारो तरुणांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरील बंदी आणि देशात पसरलेल्या भ्रष्टाचाराविरोधात जोरदार आंदोलन केले. यावेळी निदर्शकांनी पोलिसांचे बॅरिकेड्स तोडले आणि संसद भवन संकुलात प्रवेश केला. आंदोलकांनी सरकारकडे मागणी केली की, सोशल मीडियावरील बंदी तात्काळ हटवावी आणि भ्रष्टाचार संपवण्यासाठी ठोस पावले उचलावीत.
शुक्रवारपासून नेपाळमध्ये फेसबुक, यूट्यूब, एक्स यांसारख्या अनेक सोशल मीडिया साइट्स बंद करण्यात आल्या आहेत. सरकारने २६ अशा प्लॅटफॉर्म्सना ब्लॉक केले आहे जे देशात नोंदणीकृत नाहीत. यामुळे सामान्य युजर्समध्ये संताप आणि गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.इंस्टाग्रामसारख्या लोकप्रिय प्लॅटफॉर्म्सचे नेपाळमध्ये लाखो युजर्स आहेत, जे मनोरंजन, बातम्या आणि व्यवसायासाठी याचा वापर करतात.
आज, सोमवारी झालेल्या आंदोलनाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर जेन झेड (झेड जनरेशन) च्या आंदोलकांनी राष्ट्रीय झेंडे फडकावत सोशल मीडिया बॅन आणि भ्रष्टाचाराविरोधात घोषणाबाजी केली. जमावाला रोखण्यासाठी पोलिसांनी पाण्याच्या तोफांचा आणि अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर केला. यानंतर निदर्शक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. पोलिसांनी संपूर्ण परिसरात कर्फ्यू लागू केला आहे.
तरुणांनी पोलिसांवर झाडांच्या फांद्या आणि पाण्याच्या बाटल्या फेकल्या. यावेळी ते सरकारविरुद्ध घोषणा देत राहिले.लोकांचा आवाज दाबण्यासाठी सरकारने सोशल मीडियावर बंदी घालण्यासारखी पावले उचलली आहेत, असे तरुणांचे म्हणणे आहे. सोशल मीडिया बंदीनंतर टिकटॉकवर काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यात सामान्य नेपाळी नागरिकांच्या अडचणींची तुलना नेत्यांच्या मुलांच्या आलिशान जीवनशैलीशी केली जात आहे. सध्या टिकटॉक नेपाळमध्ये सुरू आहे.
सरकारने गेल्या महिन्यात एक निर्णय घेतला होता की, प्रभावित कंपन्यांना नेपाळमध्ये नोंदणी करावी लागेल, संपर्क बिंदू स्थापित करावा लागेल आणि तक्रार निवारण अधिकारी नियुक्त करावा लागेल. हे आदेश गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर लागू करण्यात आले होते.
रविवारी(दि.७) जारी केलेल्या निवेदनात, सरकारने सांगितले की ती विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सन्मान करते आणि त्यांच्या संरक्षणासाठी आणि वापरासाठी योग्य वातावरण निर्माण करण्यास वचनबद्ध आहे.
नेपाळने याआधीही अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवर बंदी घातली होती. जुलैमध्ये, ऑनलाइन फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे कारण देत टेलीग्राम अॅपला ब्लॉक करण्यात आले होते. तर ऑगस्ट 2024 मध्ये, टिकटॉकवरील नऊ महिन्यांची बंदी हटवण्यात आली होती, जेव्हा प्लॅटफॉर्मने नेपाळी नियमांचे पालन करण्यास सहमती दिली.