नवी दिल्ली : रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजच्या सामन्यात इंडिया लिजेंड संघाकडून खेळणाऱ्या युवराज सिंगने दक्षिण आफ्रिका लिजंडविरूद्ध दमदार खेळी केली. युवराजने २२ चेंडूत ५२ धावा ठोकल्या. त्याने १८ व्या षटकात झँडर डी ब्रूयनच्या एका षटकात सलग चार षटकार खेचले. तर सचिन तेंडुलकरनेही अर्धशतकी खेळी केली.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू युवराज सिंगने रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज टी२० च्या सामन्यात दक्षिण आफ्रिका लिजेंड्सविरूद्ध इंडिया लिजेंड्सकडून खेळताना तुफानी खेळी खेळली. युवराज सिंगने या सामन्यात केवळ २१ चेंडूत ६ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्याने २२ चेंडूत ५२ धावांची नाबाद खेळी केली. युवराज सिंगच्या या वेगवान खेळीच्या बळावर इंडिया लिजेंड्सने २० षटकांत ३ गडी गमावून २०४ धावांची मोठी धावसंख्या उभारली.
युवराजने सर्व चाहत्यांना आपले ‘सिक्सर किंग’ हे रूप पुन्हा एकदा दाखवून आनंद साजरा करण्याची संधी दिली. त्याने भारतीय डावाचा अठराव्या षटकात डी ब्रुयनच्या षटकातील दुसर्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या चेंडूत सलग षटकार ठोकले. युवराजने ४६ धावांवर फलंदाजी करत असताना गार्नेट क्रूगरच्या चेंडूवर षटकार मारत अर्धशतक पूर्ण केले. या खेळीदरम्यान युवराज सिंगचा स्ट्राईक रेट २३६.३६ होता.
सामन्याच्या सुरुवातीला भारताचे माजी दिग्गज खेळाडू सुनील गावसकर यांनी मैदानावर हजेरी लावली. इंडिया लिजेंड्स संघाकडून त्यांना सर्व खेळाडूंची स्वाक्षरी असलेली जर्सी भेट दिली गेली. सुनील गावसकर हे रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजचे ब्रँड अँबेसिडर आहेत.
“माझ्या मते हे वाईट नव्हते, मी जेव्हा माझ्या कारकिर्दीतील यशाच्या शिखरावर होतो, तेव्हा मी ६ चेंडूवर ६ षटकार लगावले होते. आता ४ चेंडूवर ४ षटकार ठीक आहेत. शुक्रवारी (१२ मार्च) इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात पराभव झाल्यानंतर मला वाटत आहे की माझ्याकडे भारतीय संघात पुनरागमन करण्याची चांगली संधी आहे. मी मस्करी करत आहे. मी माझ्या प्रदर्शनानंतर आनंदी आहे.”
– युवराज सिंग