किव, 12 ऑगस्ट – युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी सोमवारी (11 ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चा केली. झेलेन्स्की यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करून या चर्चेची माहिती दिली आणि युक्रेनियन जनतेला दिलेल्या पाठिंब्याबद्दल पीएम मोदींचे आभार मानले.
ही चर्चा अशा वेळी झाली आहे, जेव्हा काही दिवसांत अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्यात अलास्कामध्ये विशेष बैठक होणार आहे. या बैठकीत रशिया-युक्रेन युद्ध समाप्त करण्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
झेलेन्स्की यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदींसोबत द्विपक्षीय सहकार्य आणि जागतिक राजनैतिक परिस्थितीवर सविस्तर चर्चा झाली. त्यांनी पीएम मोदींना रशियाच्या अलिकडच्या हल्ल्यांबद्दल, विशेषतः झापोरिझिया बस स्थानकावरील हल्ल्याची माहिती दिली, ज्यात डझनभर लोक जखमी झाले होते. “युद्ध संपवण्याची राजनैतिक शक्यता दिसत असतानाही, रशिया आक्रमकता आणि हत्या सुरू ठेवण्याची इच्छा दाखवत आहे,” असे झेलेन्स्की म्हणाले.
त्यांनी पुढे नमूद केले की, भारताकडून शांततेच्या प्रयत्नांना मिळणारा पाठिंबा महत्त्वाचा आहे आणि युक्रेनशी संबंधित कोणताही निर्णय युक्रेनच्या सहभागाशिवाय होऊ नये, यावर भारताचा समज आहे. तसेच, पंतप्रधान मोदींनी सप्टेंबरमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेदरम्यान द्विपक्षीय भेटीवर आणि परस्पर दौऱ्यांवर काम करण्यास सहमती दर्शवली आहे.
दरम्यान, पंतप्रधान मोदींनी एक्स पोस्टमध्ये लिहिले की, “राष्ट्रपती झेलेन्स्की यांच्याशी बोलून आणि अलिकडच्या घडामोडींवर त्यांचे विचार जाणून घेऊन आनंद झाला. संघर्षाच्या लवकर आणि शांततापूर्ण निराकरणाची गरज भारत ठामपणे मांडतो. भारत शक्य तितके सर्व योगदान देण्यास तसेच युक्रेनसोबतचे द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यास वचनबद्ध आहे.”