कीव, 8 सप्टेंबर : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह अनेक देशांवर जास्त दराचे टॅरिफ लावले आहेत. आता युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनीही ट्रम्प यांच्या या टॅरिफ धोरणाला पाठिंबा दिला आहे. झेलेन्स्की म्हणाले की, टॅरिफ लावून ट्रम्प यांनी अगदी योग्य निर्णय घेतला आहे. झेलेन्स्की म्हणाले की, अनेक युरोपीय देश अजूनही रशियाकडून तेल आणि गॅस खरेदी करत आहेत, जे चुकीचे आहे. रशियासोबतचा सर्व व्यापार पूर्णपणे थांबवला गेला पाहिजे.
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत जेव्हा झेलेन्स्की यांना विचारण्यात आले की नुकत्याच पार पडलेल्या एससीओ समिट मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, व्ह्लादिमीर पुतिन आणि शी जिनपिंग यांना एकत्र पाहिले गेले होते. त्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प म्हणाले की, “आम्ही भारत आणि रशिया या दोघांनाही चीनच्या हातात गमावले आहे.” यावरून ट्रम्प यांनी रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर कठोर टॅरिफ लावले आहेत.
त्याच्या उत्तरात झेलेन्स्की म्हणाले, “माझ्या मते, जे देश अजूनही रशियासोबत व्यापार करत आहेत, त्यांच्यावर टॅरिफ लावणे ही एक फारच चांगली कल्पना आहे.”
याचबरोबर, झेलेन्स्की यांनी रशियाकडून तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या युरोपीय देशांचीही टीका केली आहे. झेलेन्स्की म्हणाले, “माझ्या मते, पुतिनवर आणखी अधिक दबाव टाकण्याची गरज आहे. हा दबाव अमेरिका टाकू शकते. मी सर्व युरोपीय सहयोगींना धन्यवाद देतो, पण त्यापैकी काही देश अजूनही रशियाकडून तेल आणि गॅस खरेदी करत आहेत. हे कोणत्याही दृष्टीने योग्य नाही. आपल्याला रशियाकडून कोणत्याही प्रकारची खरेदी थांबवावीच लागेल.”
झेलेन्स्की यांच्या मते, पुतिनला थांबवण्यासाठी रशियासोबतची सर्व डील्स बंद करणे आवश्यक आहे, आणि हे काम फक्त अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पच करू शकतात. झेलेन्स्की म्हणाले, “मला पूर्ण विश्वास आहे की ट्रम्प यात नक्कीच यशस्वी ठरतील.”