मुंबई, 29 एप्रिल (हिं.स.) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहलगाम हल्ल्यात महाराष्ट्रातील मृत्यूमुखी पडलेल्या ६ मृतांच्या नातेवाईकांना ५० लाखांची मदत जाहीर केली आहे.याशिवाय या कुटुंबांच्या शिक्षण, रोजगाराकडे राज्य सरकार लक्ष देणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. या हल्ल्यात पुण्यातली संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला होता, त्यांच्या मुलीला शासकीय नोकरी देण्याचा निर्णय देखील आज (दि.२९) मंत्रिमंडळाच्या बैठकीत जाहीर करण्यात आला आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या आज, मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये पहलगाममधील मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्रातील ६ मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. याशिवाय या कुटुंबांच्या शिक्षणाची, रोजगाराची हमीदेखील राज्य सरकार घेणार आहे.जगदाळे कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच घोषणा केली होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी विशेषाधिकार वापरत संतोष जगदाळेंच्या मुलीला आजच्या बैठकीमध्ये सरकारी नोकरी देण्याचा निर्णय निश्चित केला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला होता.
या घटनेत एकूण 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. ज्यात महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा समावेश होता. डोंबिवलीतील अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी हे कुटुंबियांसोबत एकत्र काश्मीर फिरायला गेले, ज्यात या तिन्ही मावसभावांचा मृत्यू झाला. तर पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे या दोघा मित्रांचाही मृत्यू झाला. तर नवी मुंबईतील दिलीप देसले यांचाही दहशतवाद्यांच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला.