नवी दिल्ली : आरोग्य हीच संपत्ती आहे हे मावळत्या वर्षाने शिकवलं. 2020 हे आव्हानांचं वर्ष होतं. 2020 चा मंत्र ‘जब तक दवाई नहीं, तब तक ढिलाई नहीं’ हा होता. आता 2021चा मंत्र -आपल्याकडे ‘औषध आहे आणि सावधगिरीसुद्धा’ हा आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. राजकोट येथील नव्या ‘एम्स’चा पायाभरणी समारंभ मोदी यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंद्वारे पार पडला. यावेळी ते बोलत होते.
भारत एकत्र येतो तेव्हा कोणत्याही मोठ्यातील मोठ्या संकटाशी यशस्वीरित्या दोन हात करू शकतो, असे या वर्षाने दाखवून दिले आहे. परिणामकारक पावले उचलल्याने भारतात उत्तम परिस्थिती आहे. कोरोना रुग्णांना वाचवण्यात भारत इतर देशांपेक्षा कितीतरी पटीने आघाडीवर आहे. भारतात लसीसंबधी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले. गेल्या वर्षी म्हणजे 2020 मध्ये करोनाच्या प्रादुर्भावामुळे नैराश्याचं वातावरण होतं, सगळीकडे संशयाचं वातावरण होतं, मात्र 2021 हे कोरोनावरील उपचाराचा आशेचा किरण घेऊन येत आहे, असं मोदी म्हणाले.
भारतात बनलेली लस भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी घेतले जात असलेले प्रयत्न आता अंतिम टप्प्यात आहे. जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबवण्यासाठी भारताची तयारी वेगाने सुरू आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
गतवर्षी ज्याप्रमाणे संसर्ग रोखण्यासाठी आपण एकत्रितपणे प्रयत्न केले तसेच लसीकरण यशस्वी करण्यासाठीही करण्याचे आवाहन त्यांनी केले, राजकोटच्या एम्समुळे 5 हजार थेट नोकऱ्या तर अगणित अप्रत्यक्ष रोजगार संधी मिळतील, असे त्यांनी सांगितले.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर एवढी दशके उलटूनही देशात फक्त 6 एम्स आहेत. अटलजींच्या 2003 मधील सरकारने अजून 6 मोठी एम्स स्थापन करण्याच्या दृष्टीने पावले उचलली होती. गेल्या सहा वर्षात 10 नवी एम्स सुरू झाली. आयुष्मान भारत योजनेखाली दूर्गम भागांमध्ये 1.5 दशलक्ष आरोग्य केंद्र व वेलनेस केंद्रे उभारण्याचे काम सुरू असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.
2020 हे आरोग्य आव्हानांचे वर्ष होते, तर 2021 हे आरोग्यविषयक समस्यांच्या सोडवणुकीचे वर्ष असेल. भारताने ज्याप्रमाणे आरोग्य आव्हानांचा सामना करताना महत्वाची भूमिका बजावली त्याचप्रमाणे आरोग्यसमस्यांचे निराकरण करतानाही बजावेल. जग सजगतेने आरोग्य सुविधांकडे पाहिल.
आरोग्यविषयक समस्या सोडवण्यासाठी 2021 मधील भारताचे योगदान हे या समस्येच्या प्रमाणात महत्वाचे ठरेल, असेही ते म्हणाले. भारत हा भविष्यातील आरोग्य आणि आरोग्यातील भविष्य या दोहोंमध्येही महत्वाची भूमिका बजावेल असे मोदींनी सांगितले.