सोलापूर : अकलूज ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी माजी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी आपल्यावर सोपवली होती. त्यात केवळ आपल्या चुकीमुळे एक जागा बिनविरोध झाली. त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारत आपण ग्रामपंचायत निवडणुकीनंतर राजकीय संन्यास घेणार असल्याची घोषणा धैर्यशील मोहिते-पाटील यांनी अकलूज येथे केली.
धैर्यशील मोहिते- पाटील यांनी ही घोषणा पत्रकार परिषद आयोजित करुन केली आहे. विजयसिंह मोहिते-पाटील गटाची अकलूज ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेची संपूर्ण जबाबदारी माजी खासदार विजयसिंह मोहिते- पाटील, जयसिंह मोहिते- पाटील व मोहिते- पाटील कुटुंबीयांवर प्रेम करणाऱ्या सर्वांनी आपणावर सोपवली होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
गेल्या 13 वर्षांपासून आपण दिलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडत आलो आहोत; परंतु आपल्या काही अडचणींमुळे अकलूज ग्रामपंचायत उमेदवारांचे अर्ज भरताना काही गोष्टींकडे दुर्लक्ष झाले. पाच नंबर प्रभागात सर्वसाधारण महिला गटासाठी एका सामान्य फळ विक्री करणाऱ्या महिलेची उमेदवारी दिली होती. मात्र, आपल्या नावावर बागवान नावाचा एक इसम त्या महिलेकडे जाऊन दोन कागदांवर संबंधित महिलेच्या सह्या घेतल्या आणि त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला.
तर संबंधित महिला उमेदवाराच्या पूरक अर्जामध्ये जातीय प्रवर्गाचा उल्लेख देखील वकिलाकडून चुकीचा झाला. त्यामुळे या ठिकाणी आमच्या पॅनेलचा उमेदवार राहिला नाही. प्रसंगी विरोधी उमेदवार बिनविरोध निवडून आले. झालेल्या चुकीची जबाबदारी स्वीकारत आपण ग्रामपंचायत निवडणुकीनंतर राजकीय संन्यास घेत आहोत. तत्पूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीतील इतर सर्व उमेदवारांचा प्रचार 15 जानेवारीपर्यंत आपण ताकदीने करून त्यांना निवडून आणू, मगच राजकारणातून बाहेर पडू, असेही त्यांनी जाहीर केले.