बीड : परळी पंचायत समिती सभापती उर्मिला शशिकांत गित्ते यांच्याविरोधात भाजप-राष्ट्रवादीने एकत्र येऊन अविश्वास ठराव मंजूर केला आहे. गित्ते यांच्याविरोधात चक्क भाजप सदस्यांनी राष्ट्रवादीला मदत केली. दरम्यान मुंडे भाऊ – बहिणींमधील कडवटपणा दूर होण्याच्या मार्गावर आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आज गुरुवारी परळी तहसील कार्यालयात अविश्वास ठरावावेळी उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे यांनी पिठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले. अविश्वास ठरावाच्या वेळी सभापती गित्ते या गैरहजर होत्या. यावेळी चक्क भाजप सदस्यांनी राष्ट्रवादीला मदत केल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. तसंच यानिमित्ताने मुंडे भाऊ-बहिणींमधील कडवटपणा दूर होत असल्याची चर्चा सध्या परळीत रंगली आहे.
* सूचक वक्तव्याचा आला प्रत्यय
एरवी कट्टर राजकीय विरोधक म्हणून भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे राज्यातील राजकारणात परिचित आहेत. १२ डिसेंबर रोजी बंधू धनंजय मुंडे यांनी राजकीय कडवटपणा चालेल, पण घरात सुसंवाद हवा, असं सूचक वक्तव्य केलं होतं. याच वक्तव्याला धरून आज पंचायत समिती ठरावावर भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे बहीण-भावातील राजकीय कडवटपणा दूर होतोय की काय, अशी चर्चा परळीच्या नाक्यानाक्यावर सुरू आहे.