सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज येथे औषध फवारणी पंप बंद करत असताना स्टार्टरमधील विजेचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. राजेंद्र विश्वनाथ भोसले (वय ५०) असे त्यांचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व तीन मुले असा परिवार आहे.
मयत राजेंद्र भोसले यांनी शेतात दोडके, घेवड्याची लागवड केली आहे. शनिवारी ते पत्नी व मुलगा रंजित यांच्यासोबत शेतात लाकडे रोवण्याचे काम करत होते. दिवसा पाणीपुरवठा असल्याने घेवड्याला औषधाची फवारणी करून एचडीपी फवारणी यंत्राचे स्टार्टर बटन बंद करत होते.
यावेळी विद्युत पेटीतील स्टार्टरमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने राजेंद्र यांना जोराचा विद्युत झटका बसल्याने ते जागेवरच बेशुद्ध अवस्थेत पडले. मुलगा रंजित याने फ्यूज बंद केला. बेशुद्धावस्थेतील राजेंद्र भोसले यांना ज्ञानेश्वर भोरे यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता उपचारापूर्वीच निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
* बँक अधिकाऱ्याला दमदाटी दोघांना अटक
सोलापूर : बँकेकडून घेतलेल्या कर्जाचा हप्ता मागण्यासाठी घरी गेलेल्या बँक अधिकाऱ्यास शिवीगाळ, दमदाटी व धक्काबुक्की केल्या प्रकरणी दोन जणांविरुद्ध वळसंग पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली.
सिद्धार्थ दत्तू गायकवाड व प्रेमनाथ चंद्रकांत वाघमारे (दोघे रा वळसंग ता द . सोलापूर ) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत वळसंग येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे अधिकारी अशोक कुमार आदीनारायण दोस कायलपाटी (वय ३४, राहणार धनलक्ष्मी होम्स श्री अरबिंदो मीयापुर हैदराबाद सध्या रा फ्लॅट नं ३०१ श्री अपार्टमेंट वामन नगर, जुळे सोलापुर ) यांनी फिर्याद दिली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गेल्या १३ ऑगस्ट रोजी सिद्धार्थ गायकवाड याचे घरासमोर मी कर्जाचा हप्ता भरणेबाबत सांगण्यासाठी गेलो. तेव्हा तेथे मला सिद्धार्थ गायकवाड व प्रेमनाथ वाघमारे यांनी तुमचे कुठले बँकेचे पैसे आम्ही बँकेतून फक्त कर्ज घेतो परत भरत नसतो. वळसंगमध्ये नोकरी करायची असेल तर गप्प जा. नाहीतर तुला तलवारीने कापून टाकीन, असे म्हणून अश्लील शिवीगाळी केली. तसेच माझे हातात असलेले कागदे हिसकावून फेकून दिले व दोघांनी मला धक्काबुक्की केली. तसेच २१ ऑगस्ट रोजी त्या दोघांनी मिळून मला तुम्ही आता मला यापुढे दर महिन्याला एक कर्ज मंजूर करायचं. नाही तर आम्ही तुमच्यावर ॲट्रॉसिटी प्रमाणे गुन्हा दाखल करू. नीट विचार करून नोकरी करायची अशी धमकी देऊन माझ्या सरकारी कामकाजात अडथळा आणला आहे.
या फिर्यादीनुसार पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आज दोघांनाही अटक केली. अधिक तपास एएसआय धनु राठोड करीत आहेत.