सोलापूर : शेतात गांजाची लागवड करण्याची परवानगी मागणाऱ्या मोहोळ तालुक्यातील शिरापूर येथील अनिल पाटील या शेतकऱ्याला बोलावून घेऊन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी त्यांची समजूत काढली. गांजा लावणे हे बेकायदा असून त्याची लागवड करणार असाल तर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी तंबी देत जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकरी पाटील यांना चांगलेच सुनावले.
कोणत्याच शेतीमालाला बाजारपेठेत योग्य भाव मिळत नसल्याची तक्रार करत अनिल पाटील या शेतकऱ्याने शेतात गांजा लागवड करण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितली होती. याचे सविस्तर निवेदन त्यांनी प्रशासनाला दिले होते. गांजाला चांगला भाव मिळत असल्याने गांजा लागवड करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी निवेदनात केली होती. याची दखल घेत जिल्हाधिकारी शंभरकर यांनी शेतकरी पाटील यांना शुक्रवारी बोलावून घेतले. सुरुवातीला त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर त्याला खडे बोल सुनावले. गांजा लावणे बेकायदा कृत्य आहे. तसे केल्यास गुन्हा दाखल करू, अशी तंबी देत त्यांचे समुपदेशनही केले.
* नेमका प्रकार काय, वाचा
अनिल आबाजी पाटील ( रा. शिरापूर, तालुका मोहोळ) या शेतकऱ्यांने गांजा लागवडीला परवानगी देण्यासाठी थेट जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. अनिल पाटील हे वादग्रस्त व्यक्तिमत्त्व आहे, त्यांनी अनेकवेळा जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करत गोंधळ घातला आहे.
खरतर गांजाची शेती करणं हा गुन्हा आहे मात्र सध्याची परिस्थिती पाहता शेतकऱ्याने नाईलाजाने गांजाची शेती करण्यासाठी परवानगी मागितली आहे. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शेतीमालाला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे शेती करणे कठीण झाले आहे. मशागतीसाठी केलेला खर्च देखील मिळत नाही. तसेच एखाद्या साखर कारखान्याला ऊस गाळपासाठी दिला असता त्याचे देखील बिल लवकर मिळत नाही”. अशी व्यथा त्यांनी आपल्या पत्रात मंडळी आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना दिलेल्या पत्रात पाटील यांनी म्हटले, शिरापूर या गावांमध्ये माझ्या स्वतःची दोन एकर जमीन आहे. त्यामध्ये गांजा लागवडीला परवानगी द्यावी कारण सध्या कोणत्याही पिकाला हमीभाव नाही, त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. गांजा लावल्यास त्याला भाव मिळतो शेतकऱ्याला चांगले पैसे मिळतील म्हणून गांजा लागवडीस परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे.
15 सप्टेंबर 2021 पर्यंत आपण मला परवानगी द्यावी अन्यथा 16 सप्टेंबरपासून आपली परवानगी मिळाली असे गृहीत धरून मी गांजा लागवड करेन पुढे जे होईल त्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर राहील, असा इशाराही अनिल पाटील यांनी पत्रामध्ये दिला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्याच्या या पत्रावर जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार होते. ते जिल्हाधिका-यांनी चांगलेच सुनावले.