सोलापूर / तुळजापूर : यावर्षी ७ ऑक्टोबर रोजी घटस्थापना होत असून नवरात्रारंभ होत आहे. या दिवशी चित्रा आणि वैधृति योग असला तरी घटस्थापना तिथिप्रधान असल्याने गुरुवारी ब्राह्म मुहूर्तापासून म्हणजे सुमारे पहाटे ५ पासून दुपारी १:४५ पर्यंत कोणत्याहीवेळी घटस्थापना करून नवरात्रातील पूजन करता येईल, असे ज्येष्ठ पंचांगकर्ते मोहनराव दाते यांनी सांगितले.
रविवार, १० रोजी ललिता पंचमी असून मंगळवार, १२ ला महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे) आहे. बुधवार, १३ रोजी महाअष्टमीचा उपवास करावयाचा असून गुरुवार, १४ रोजी नवरात्रौत्थापन (खंडे महानवमी, नवरात्र समाप्ती) आहे आणि दुसऱ्या दिवशी १५ तारखेला शुक्रवारी दसरा आहे.
यावर्षी घटस्थापनेपासून दसरा नवव्या दिवशी असला तरीही नवरात्रोत्थापन आठव्या दिवशीच असल्याने यंदाचे वर्षी नवरात्र आठच दिवसांचे आहे. चतुर्थी तिथीचा क्षय झाल्याने नवरात्र आठ दिवसांचे झाले आहे. यापूर्वी अनेक वेळेस असे झालेले आहे. नवरात्रामध्ये देवीस रोज एक माळ अर्पण करताना जितक्या दिवसाचे नवरात्र असेल तेवढ्या माळा अर्पण कराव्यात. तिथीचा क्षय असताना एकाच दिवशी दोन माळा अर्पण करू नये. त्यामुळे यावर्षी आठच माळा अर्पण कराव्यात.
यंदाचे वर्षी कोरोनाच्या संकटामुळे किंवा अशौचामुळे ज्यांना ७ ऑक्टोबर रोजी घटस्थापना करणे शक्य होणार नाही त्यांनी अशौच निवृत्तिनंतर (अशोच संपल्यावर) ९ ऑक्टोबर, १० ऑक्टोबर, १२ ऑक्टोबर किंवा १३ ऑक्टोबर यापैकी कोणत्याही दिवशी घटस्थापना करावी व १४ रोजी नवरात्रोत्थापन करावे. महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे) ह्या दिवशी मध्यरात्री अष्टमी तिथीवर देवीचे पूजन करण्याची प्रथा आहे. १२. ऑक्टोबर रोजी रात्री ९:४८ पर्यंत सप्तमी असली तरीही मध्यरात्री अष्टमी तिथी मिळत असल्याने त्या दिवशी महालक्ष्मीपूजन दिलेले आहे. मात्र दुर्गाष्टमी १३ ऑक्टोबर रोजी आहे.
विजयादशमी, दसरा, सीमोल्लंघन हे १५ ऑक्टोबर रोजी असून साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला दसरा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी विजय मुहूर्तावर अनेक लोक आपल्या नवीन उपक्रमाचा आरंभ करतात. हा विजय मुहूर्त महाराष्ट्रामध्ये दुपारी १४:२१ ते १५:०८ या दरम्यान आहे.
नवरात्रामध्ये देवीचा टाक किंवा मूर्ती याची वेगळी स्थापना करून पूजा केली जाते. काही जणामंध्ये इतर देवांची पूजा ९ दिवस केली जात नाही, ते अयोग्य आहे. अशा वेळेस पूजेतील इतर देवांची नेहमीप्रमाणे रोज पूजा केली पाहिजे, असेही दाते यांनी म्हटले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* भक्तांना प्रत्यक्षात घेता येणार तुळजाभवानी मातेचे दर्शन
कोरोनामुळे राज्यातील मंदिरे बंद होती. मात्र आता नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून भक्तांना देवदर्शन घेता येणार आहे. तुळजापुरातील तुळजाभवानी मातेचे मंदिर उघडण्यात येणार आहे. दररोज १५ हजार भाविकांना दर्शनासाठी प्रवेश मिळणार आहे. यामध्ये परराज्यातील भाविकांना लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणे बंधनकारक आहे. लस घेतली नसल्यास त्यांचा ७२ तासांपूर्वीची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असल्याचा अहवाल आवश्यक आहे.
चेहऱ्यावर मास्क असणे बंधनकारक, सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक, नवरात्रौत्सवात कोजागिरी पौर्णिमा रद्द केली आहे. १८ ते २०ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्यात बंदी, तुळजापूर शहरात भाविकांना प्रवेश नाही, तुळजाभवानी मंदिरात ६५ वर्षांवरील नागरिकांना तसेच गरोदर स्त्रिया आणि १० वर्षांखालील मुलांना प्रवेश नाही, भाविकांना केवळ मंदिरात प्रवेश, अभिषेक आणि इतर विधींना परवानगी नसल्याचे सांगितले.
तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेचेही दर्शन भक्तांना घेता येईल. मात्र, त्यासाठी मंदिर संस्थान आणि प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमावलींचे पालन करावे लागणार आहे. ७ ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रौत्सवाला प्रारंभ होत आहे. त्यासाठी उस्मानाबाद जिल्हाधिकारी आणि तुळजाभवानी मंदिर संस्थानाकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यानुसार, दररोज पहाटे ४ वाजल्यापासून ते रात्री १० वाजेपर्यंत या काळात १५ हजार भाविकांनाच दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे.