मुंबई : हवामान खात्याकडून आज (बुधवार) कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांत ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, परभणी, नांदेड, लातूर, उस्मानाबाद यांचा समावेश आहे. तसेच, पुढील चार ते पाच दिवस राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातील रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या समुद्रकिनारच्या जिल्ह्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातही पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज आहे.
त्यामध्ये सातारा, पुणे आणि अहमदनगर या जिल्ह्यांतील डोंगराळ भागात पावसाची शक्यता अधिक असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. त्याचप्रमाणे नाशिक, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, जळगाव, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यातील काही भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस या जिल्ह्यांमध्ये पडण्याचा अंदाज असून इतर जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
समुद्रकिनारच्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत कोकणातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पावसाचं प्रमाण कमी असेल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्याचप्रमाणे सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. १६ ते १८ ऑक्टोंबरच्या दरम्यान, परतीच्या पावसाचे महाराष्ट्रात, तर १३ ते १४ ऑक्टोंबरला राजस्थानमध्ये आगमन होण्याची शक्यता वर्तवली आहे. उत्तर महाराष्ट्रात १९ आणि २० ऑक्टोंबरला परतीचा मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज अभ्यासकांचा आहे.
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असून शेतकऱ्यांनी पिकांची काढणी सुरू केली आहे. अशा परिस्थितीत मान्सूनच्या सरी पुन्हा कोसळणार असल्यामुळे कापणी केलेल्या पिकांचं संरक्षण करण्याची मोठी जबाबदारी शेतकऱ्यांवर असणार आहे. अनेक शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिकं उन्हात वाळवायला सुरवात केली आहे. त्यामुळे अचानक कोसळणाऱ्या पावसाच्या सरींमुळे पिकांच्या काढणीनंतरच्या व्यवस्थापनाच्या बाबतीत शेतकऱ्यांना सावधानता बाळगावी लागणार आहे.
परतीचा वळीव पाऊस पश्चिम महाराष्ट्रात होऊ शकतो . मात्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये वळीव पावसामुळे ‘वॉटर लॉगींग’ होण्याची शक्यता हवामानशास्त्र अभ्यासकांना व्यक्त केली आहे. अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार परतीच्या पावसाचे वातावरण २५ ऑक्टोंबरनंतर निवळण्यास सुरवात होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे.