नवी दिल्ली : कोरोनाचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. कोरोनामुळे 2020 मध्ये व्यापाऱ्यांच्या आत्महत्येत मोठी वाढ झाली आहे. तब्बल 11716 व्यापाऱ्यांनी आत्महत्या केली. 2019 च्या तुलनेत हे प्रमाण 29 टक्के अधिक आहे. अशी माहिती केंद्र सरकारने संसदेत दिली. दरम्यान, 2019 मध्ये व्यापाराशी संबंधित असलेल्या 9052 लोकांनी आत्महत्या केली होती.
कोरोनामुळे जगभरातील सर्व व्यवहार काही काळ ठप्पच झाले होते. याचा सर्वाधिक फटका व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांना बसला असून अनेकांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्डस् ब्युरोच्या आकडेवारीनुसार 2019 शी तुलना केली असता 2020 मध्ये शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या अधिक घटना घडल्या आहेत.
कोरोनाचा आरोग्यसह अर्थव्यवस्थेवरही मोठा परिणाम झाला आहे. यामुळेच 2019 च्यातुलनेत 2020 मध्ये व्यापाऱ्यांच्या आत्महत्येत मोठी वाढ झाली आहे. 2020 मध्ये तब्बल 11 हजार 716 व्यापाऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती केंद्र सरकारने मंगळवारी संसदेत दिली.
एकूण आत्महत्यांचा आकडा सुमारे दहा टक्क्यांनी वाढून 1 लाख 53 हजारांवर गेला. हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. साधारणपणे शेतकऱ्यांच्या तुलनेत व्यापारी समुदायामध्ये आत्महत्येमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण नेहमीच कमी होते. परंतु कोरोना, लॉकडाउनमुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटामुळे व्यापारी वर्ग तणावाखाली आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
2019 च्या तुलनेत हे प्रमाण तब्बल 29% अधिक आहे. अर्थात 2020 म्हणजेच कोरोना काळात व्यापारी वर्गाने कृषी क्षेत्राशी संबंधित लोकांपेक्षाही अधिक आर्थिक तणाव आणि संकटाचा सामना केला आहे. गृह मंत्रालयाने एनसीआरबी (NCRB)चा रिपोर्टच्या हवाल्याने सांगितले, की 2019 मध्ये व्यापाराशी संबंधित असलेल्या 9052 लोकांनी आत्महत्या केली होती, तर 2020 मध्ये 11,716 लोकांनी आत्महत्या केली.
एनसीआरबीच्या अहवालानुसार, 2020 मध्ये 11,716 व्यापाऱ्यांनी आत्महत्या केली. तर याच काळात 10,677 शेतकऱ्यांनीही आत्महत्या केल्या आहेत. 2015च्या आकडेवारीचा विचार करता, तेव्हा प्रत्येक एका व्यापाऱ्यामागे 1.44 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. पण, 2020 मध्ये प्रत्येक एका शेतकऱ्यामागे 1.1 व्यापाऱ्याने आत्महत्या केली आहे.
2020 मध्ये 11 हजार 677 व्यापाऱ्यांनी आत्महत्या केली. त्यात 4356 छोट्या व्यापाऱ्यांच्या आणि 4226 दुकानदारांचा समावेश आहे. व्यावसायिक क्षेत्रातील आत्महत्यांच्या प्रमाणात 29 टक्क्यांनी वाढ झाली असून संपूर्ण देशात आत्महत्येच्या प्रमाणात 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आतापर्यंत शेतीचे नुकसान आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरीच सर्वाधिक आत्महत्या करतात असे आकडेवारी सांगत होती. मात्र कोरोनामुळे व्यावसायिकसुद्धा मानसिक तणावाखाली असल्याचे सिद्ध झाले आहे.
सर्वाधिक आत्महत्या ( 19909) महाराष्ट्रात झाल्या. त्या पाठोपाठ तमिळनाडू (16883), मध्य प्रदेश (14578), बंगाल (13103) आणि कर्नाटक (12259) आहे. या पाच राज्यांतील आत्महत्यांचे प्रमाण हे एकूण आत्महत्येच्या 50.1 टक्के आहे. उर्वरित 49.9 टक्के आत्महत्या या देशातील 23 राज्ये आणि आठ केंद्रशासित प्रदेशांमध्ये झाल्या आहेत. उत्तर प्रदेशातील आत्महत्यांचे प्रमाण केवळ 3.1 टक्के आहे.