सोलापूर – गावातील क्रिकेट सामन्याच्या बक्षीस वितरण समारंभाच्या वेळी प्रमोद उंबरे यास कोण भाई, कुठला भाई, तो मुंबईत राहतो आमच्या गावात त्याचे काय काम! असे म्हणत आरडाओरड केल्याचा राग धरून एका 55 वर्षीय इसमास मोटारीतून पळवून नेऊन बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला.
ही घटना शुक्रवारी (दि.३ डिसेंबर) रोजी रात्रीच्या सुमारास उदनवाडी (ता. सांगोला )येथे घडली. या प्रकरणात सांगोल्याच्या पोलीसांनी चौघां विरुद्ध अपहरण आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली. त्यांना ५ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश सांगोल्याच्या न्यायालयाने दिला आहे .
शिवाजी तुकाराम मोटे (वय ५५रा. उदनवाडी ता.सांगोला) असे मयत झालेल्या इसमाचे नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी प्रमोद ठोंबरे, गणेश सोपान कांबळे, दादा उर्फ विकास चौगुले (सर्व रा. कारंडेवाडी) आणि आसिफ लियाकत काजी (रा.नाझरे ता.सांगोला) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
उदनवाडी ( ता. सांगोला) येथील मारुती मंदिराजवळ सायंकाळच्या सुमारास गावात झालेल्या क्रिकेट सामन्याचे बक्षीस वितरणाच्या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शिवाजी मोटे याने प्रमोद ठोंबरे याला तू मुंबईचा आहे, आमच्या गावात तुझे काय काम आहे, असे म्हणत आरडाओरड करत होता. कार्यक्रम संपल्यानंतर गावातील चौकात प्रमोद ठोंबरे याच्यासह चौघांनी त्याला पकडून प्लास्टिक पाईप आणि वायरने बेदम मारहाण करीत मोटारीतून कोरडवाडी येथील नदीकडे पळवून नेले.
त्याला पुन्हा मारहाण करून रात्री १० वाजेच्या सुमारास गावात आणून सोडले होते. त्यानंतर शिवाजी मोटे हा घरात जाऊन झोपला होता. त्यानंतर तो सकाळी मृतावस्थेत आढळून आला. पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर मयताचे शवविच्छेदनानंतर करण्यात आले. तेव्हा त्याचा अंगावर मारहाणीचे व्रण दिसून आले. शिवाय त्याचा मृत्यू मारहाणीत झाला, असा प्राथमिक अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला.
शिवाय कार्यक्रमाच्या वेळी हा प्रकार घडत असताना मयताच्याच्या साथीदाराने चौघांना पाहिल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. दरम्यान फौजदार संदीप नाळे यांनी नुकतीच चौघांविरुद्ध सांगोला पोलिसात फिर्याद दाखल केली. त्याप्रमाणे पोलीसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली. आरोपींपैकी प्रमोद ठोंबरे (रा. कारंडेवाडी) हा मात्र घटनेनंतर फरार झाला. पुढील तपास सहायक निरीक्षक यमगर हे करीत आहेत.