सोलापूर – एसटी कर्मचारी संपाच्या समर्थनार्थ माकप नेते, माजी आमदार नरसय्या आडम यांनी आज कार्यकर्त्यांसह आंदोलन केले. यावेळी पोलिसांकडून आडम मास्तरांसह कार्यकर्त्यांना अटक केली. यावर शिवशाही की दडपशाही? असा सवाल आडम मास्तरांनी उपस्थित केला.
महाराष्ट्र राज्य परिवहन कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन हे शासनामध्ये विलीनीकरण करून या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा व त्या प्रकारचे सर्व सुविधा लाभ मिळण्याकरिता राज्यव्यापी बेमुदत संपावर गेले. या दरम्यान या संपातील आंदोलनकर्त्यांवर राज्याचे परिवहन मंत्री यांनी मेस्मा लावण्याची धमकी दिली आहे. कामगार आंदोलन मोडून काढून त्या कामगारांना बेचिराख करण्याचा हा बेबंद निर्णय केल्याचा आरोपही आडम मास्तरांनी केला.
आत्तापर्यंत जवळपास १० हजार कामगारांना निलंबित केले आहे. आणि १५०० रोजंदारी कामगारांना बडतर्फ केले आहे. महाविकास आघाडी सरकार हे शिवशाहीचे आहे कि, दडपशाहीचे? असा जळजळीत सवाल कॉ. आडम मास्तर यांनी केला. एस.टी.कर्मचाऱ्यावर मेस्मा लावणे हे पूर्णपणे बेकायदेशीर असून त्याच्या विरुद्ध आम्ही कर्मचाऱ्यांच्या बाजूने उभे राहणार असल्याचे ठणकावून सांगितले.
आज सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सच्या वतीने महाराष्ट्र राज्यभर एस.टी.कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला सक्रीय पाठींबा दिलेला असून त्यांच्या समर्थनार्थ धरणे आंदोलनाची हाक दिली. जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन केले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यावेळी प्रथम भारतीय सेना प्रमुख बिपीन रावत यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केले व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सरकारच्या या आडमुठी धोरणाचा निषेध केले. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करून कार्यकर्ते पांगवले.
कॉ. आडम मास्तर, एम.एच.शेख यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन सदर बझार पोलीस ठाणे येथे रवानगी केली. या दरम्यान सिटूचे राज्य सचिव सलीम मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली आरिफ मणियार, रवी गेंटयाल, मालू कोकणे आदींचे शिष्टमंडळ तहसीलदार यांना निवेदन दिले.
यावेळी सदर बझार पोलीस ठाण्यात अनिल वासम, युसुफ शेख , नसीमा शेख, शकुंतला पाणीभाते, विल्यम ससाणे, विजय हरसुरे, सुवर्णा गुंडू आदींसह ११ जणांवर गुन्हे दाखल केले.