□ मुलांना आवडीच्या क्षेत्रात करिअरची संधी द्या : शिवशंकर
सोलापूर : शिक्षण घेत असताना मुलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्याची संधी पालकांनी उपलब्ध करून दिली तर मुले अधिक चांगल्या पद्धतीने घडू शकतील, असे मत मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी व्यक्त केले. Distribution of school materials to the children of journalists by Karjagi Youth Foundation
आज रविवारी (ता. 12) जुनी मिल मैदानातील नागेश करजगी ऑर्किड स्कूलमध्ये सोलापूर श्रमिक पत्रकार संघ व नागेश करजगी यूथ फाउंडेशनतर्फे पत्रकारांच्या पाल्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मनपा आयुक्त पी. शिवशंकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस या होत्या.
यावेळेस करजगी ऑर्किड कॉलेजचे संस्थापक तथा उद्योजक कुमार करजगी, करजगी यूथ फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. बंडोपंत पाटील, पत्रकार संघाचे खजिनदार संतोष शिरसट आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी केले.
अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. फडणवीस म्हणाल्या, मुलांचे करिअर निवडताना त्यांच्या स्वप्नांना मोठे करणे मुलांबरोबरच पालकांचेही कर्तव्य आहे. त्यामुळे मुलांची आवड लक्षात घेऊन त्यांना करिअर करू द्यावे. त्यासाठी दोघां मधील समन्वय महत्त्वाचा असून मुलांच्या स्वप्नांना पालकांनीच पंख दिले पाहिजेत. यावेळी उद्योजक करजगी यांनी जुनी मिल जागेसाठी व कामगारांच्या देय रकमा मिळवून देण्यासाठी आपली 35 वर्षांची संघर्षमय वाटचाल कशा पद्धतीने झाली हे सांगून आपल्या एकुलत्या एका मुलाला परमेश्वराने घेऊन गेल्याने आपण शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून हजारो मुले घडविण्याचा संकल्प केल्याचे नमूद केले.
फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. पाटील यांनी, गेल्या पंधरा-सोळा वर्षापासून करजगी यूथ फाउंडेशन शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात काम करीत असून मुलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा, रक्तदान शिबिर, नवोदित कवींच्या कवितांचे प्रकाशन आदी विविध समाजोपयोगी उपक्रम राबवित असल्याचे सांगितले. तसेच भविष्यात ऑर्किड स्कूलच्या या इमारतीमध्ये गोरगरीब यूपीएससी-एमपीएससी यासारख्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी मोफत अभ्यासिका उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा मानस असल्याचेही ते म्हणाले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/559794452364955/
या कार्यक्रमास सोलापूर श्रमिक पत्रकार संघ व नागेश करजगी यूथ फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, सदस्य व पत्रकार आणि त्यांचे पाल्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजयकुमार राजापुरे यांनी केले तर आभार पत्रकार संघाचे सरचिटणीस समाधान वाघमोडे यांनी मानले.
□ नऊशे घरांसाठी मोफत जागा देणार
माजी सैनिक, पोलीस, शिक्षक व पत्रकार बांधवांच्या नऊशे घरांसाठी जुनी मिल मैदानात मोफत जागा देण्याची घोषणा जुनी मिल संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा उद्योजक कुमार करजगी यांनी केली. तसेच येत्या नऊ ऑगस्टपासून या कामाला सुरुवात होईल, असेही ते म्हणाले.
□ मुलांना याचीही शिकवण द्या
मुलांना केवळ शिक्षण देऊन उपयोग नाही तर त्यांना शिस्त आणि सामाजिक बांधिलकीची शिकवण देणेही गरजेचे आहे, असे मत मनपा आयुक्त पी.शिवशंकर यांनी व्यक्त केले.
□ सुधारण्यासाठी वेळ घालवा
आपल्या स्वप्नांना पुढे घेऊन जाण्यासाठी पूर्ण समाजाची निर्मिती आणि जडणघडण महत्त्वाची असून प्रत्येक क्षण सुधारण्यासाठी घालविला तर समाज आणि राष्ट्र निर्मितीसाठी त्याचा उपयोग होईल, असा विश्वास सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी व्यक्त केला.
https://www.facebook.com/109399567404448/posts/559701835707550/
—–
》 शालेय साहित्य दरात २० टक्क्यांनी वाढ; उद्यापासून शाळेची घंटा वाजणार
सोलापूर : इंधन, कागद, शाई व स्टीलच्या दरात वाढ झाल्याचा परिणाम शालेय साहित्यावर झाला आहे. वह्या, पुस्तकांसह इतर साहित्याच्या दरात १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा ऑनलाईन सुरू होत्या. निर्बंध शिथिल झाल्यानंतर यंदा पुन्हा पहिल्या दिवसांपासून शाळा ऑफलाइन सुरू होणार आहेत.
उद्या सोमवारी, १३ जूनपासून शाळेची घंटा वाजणार आहे. तब्बल दोन वर्षांनंतर विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने शाळेचा परिसर गजबजणार आहे. सध्या पालकांची शालेय साहित्य खरेदीची लगबग सुरू आहे.
नोटबुक, कंपासपेटी, स्कूल बॅग, पेन, वह्या, पाटी या साहित्यांना मागणी आहे. ग्रामीण भागातील शालेय साहित्य दुकानातही पालकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. लॉकडाउन पूर्वीच्या दरात आणि आताच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मात्र, मुलांचे नुकसान होऊ नये म्हणून गोरगरीब पालकही शैक्षणिक
साहित्य खरेदी करतानाचे चित्र आहे. दोन वर्षांत लॉकडाउनमुळे शालेय साहित्याची दुकाने प्रदीर्घ काळ बंद होती. त्यामुळे या क्षेत्रातील व्यावसायिकांना मोठे नुकसान सहन करावे लागले. आता पुन्हा देश आणि राज्यभरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने पालकांसह व्यावसायिकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. सध्या १०० पानी वह्या १० ते २०, २०० पानी ३५ ते ४०, लॉगबुक वह्या ४० ते ८५ रुपये दराने विक्री होत आहेत. तसेच पेन ५ ते ५० रुपये, रिफिल ३ ते २०, कंपास ६० ते ३५० , वर्तुळ ६० ते ८०, स्कूल बॅग १०० ते १००० रूपये दराने विक्री होत आहे. यामध्ये सरासरी २० टक्के दरवाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/559781479032919/