सोलापूर : श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणी पाडकामाच्या विरोधात कारखान्याचे माजी चेअरमन धर्मराज काडादी यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी १२ वाजता सोलापूर – विजापूर राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. Siddheshwar Sugar Factory Road Stopped; Chimney rescue, factory rescue announcements
सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडून विमानसेवा सुरु व्हावी या साठी मागील 25 दिवसापासून सोलापूर विकास मंचतर्फे उपोषण सुरू आहे. आणि त्याविरोधात साखर कारखानाच्या सभासदांनी आता रास्तारोको आंदोलन केलंय. ‘चिमणी बचाव, कारखाना बचाव’च्या घोषणा देत सभासद शेतकरी रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. विमानसेवा आणि सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यावरुन सोलापूर जिल्ह्यातील वातावरण चांगलच तापलं आहे.
हरित लवादाने कारखान्याचा गाळप बंद करावा, असे आदेश देण्यात आले असून याविरोधात माजी आमदार शिवशरण पाटील, बाजार समितीच्या संचालिका इंदुमती अलगोंडा पाटील, जिल्हा परिषद सदस्य अमर पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक देवकते, कारखान्याचे संचालक शिवानंद पाटील, श्रीशैल पाटील, राधाकृष्ण पाटील, प्रमोद बिराजदार यांच्यासह सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे सभासद शेतकरी यांनी सोलापूर – विजापूर राज्य महामार्ग अडवून रास्ता रोको केला.
मान्यवरांनी मनोगते व्यक्त करत कोणत्याही परिस्थितीमध्ये कारखाना बंद पडू देणार नाही, असा सूर धरला. यावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. या आंदोलनाचा पुढचा भाग म्हणून आता कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांनी सोलापूर विजापूर महामार्ग रोखला होता. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे सोलापूर विजापूर महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक जवळपास अर्धा तास थांबली होती.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
कारखान्याचे माजी चेअरमन धर्मराज काडादी हे स्वतः या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत. सोलापूरच्या विकासाच्या नावाखाली सिद्धेश्वर सहकारी कारखाना बंद पाडण्याचे षडयंत्र काही लोकांचे आहे. अशा प्रतिक्रिया आंदोलनात सहभागी शेतकरी आणि धर्मराज काडादी यांनी दिली आहे.
सोलापुरातील होटगी रस्त्यावर 350 एकर क्षेत्रात विमानतळ अस्तित्वात आहे. त्यालगतच सिद्धेश्वर साखर कारखाना आहे. सुमारे 50 वर्षांपासून हा कारखाना कार्यरत आहे. भारतीय विमानतळ विकास प्राधिकरणाच्या अहवालानुसार सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणीमुळेच विमानसेवा सुरू होऊ शकत नाही. त्यामुळं हा चिमणीचा अडसर दूर करुन सोलापूरची विमानसेवा सुरु करावी, अशी मागणी केली जात आहे.
90 मीटर उंच असलेल्या चिमणीमुळं विमानसेवा सुरु करण्यात अडथळा येत आहे. सोलापूर महापालिका प्रशासनाने देखील सिद्धेश्वरची चिमणी यापूर्वीच बेकायदेशीर ठरवली आहे. त्यावर न्यायालयीन लढाई सुरु आहे. दुसरीकडे सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या बाजूनेही ऊस उत्पादक सभासद शेतकरी, कारखान्याचे कर्मचारी, सभासद, कारखान्यावर उपजीविका अवलंबून असलेले अन्य घटक रस्त्यावर उतरले आहेत.
दरम्यान, सोलापूर विमानसेवेला मुख्य अडथळा ठरणारी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडण्यात यावी यासाठी गेल्या 25 दिवसापासून सोलापूर विकास मंचने चक्री उपोषण सुरू केले आहे. या उपोषणादरम्यान सिद्धेश्वर साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष धर्मराज कडादी यांची मंचाचे केतन शहा यांच्याशी वाद झाला.
यावेळी कडादी यांनी पिस्तूल दाखवत गोळी घालेन अशी धमकी दिल्याने तणाव निर्माण झाला आहे. यावरुन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे राज्याचे अध्यक्ष ललित गांधी यांनी कडादी यांना आव्हान दिले आहे. आम्ही काय बांगड्या घालून बसलेलो नाहीत असं गांधी यांनी म्हटलं आहे. आमची माझी इच्छा फक्त सोलापूरची विमानसेवा सुरू व्हावी अशी आहे. साखर कारखाना बंद व्हावा अशी आमची इच्छा नाही, पण आमच्यावर कोणी दबाव किंवा, दडपण आणण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही अशी भूमिका ललित गांधी यांनी घेतली आहे.