● 17 हजार 191 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान होणार
● 50 संशोधकांना पीएच.डी पदवी तर 57 सुवर्णपदकाचेही वितरण होणार
सोलापूर – पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा अठरावा दीक्षांत समारंभ सोमवारी (12 डिसेंबर ) सकाळी अकरा वाजता विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात होणार आहे. यावेळी एकूण 17 हजार 191 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. Punyashlok Ahilya Devi Holkar Solapur University’s eighteenth convocation ceremony on Monday
याचबरोबर 50 संशोधक विद्यार्थ्यांना पीएच. डी पदवी तर 57 विद्यार्थ्यांना सुवर्णपदके देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारंभास मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. डॉ. सुहास पेडणेकर यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती राहील.
सोमवारी सकाळी साडेदहा वाजता दीक्षांत सोहळ्याच्या कार्यक्रमास सुरुवात होईल. प्रथम प्रशासकीय इमारतीपासून ते दीक्षांत मंडपापर्यंत मिरवणूक निघणार आहे. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर हे ज्ञानदंड हाती घेऊन मिरवणुकीच्या अग्रभागी असणार आहेत. वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, मानवविज्ञान विद्याशाखा, आंतर विद्याशाखा, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांना यावेळी पदवी देऊन सन्मानित करण्यात येईल.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
यावर्षी 50 विद्यार्थ्यांना पीएच.डी पदवी प्रदान केली जाणार आहे. पीएचडी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये 37 मुले तर 13 मुलींचा समावेश आहे. त्याचबरोबर यंदा 57 विद्यार्थी सुवर्णपदकाचे मानकरी ठरले आहेत. यंदा नवीन चार सुवर्णपदकाची वाढ झालेली आहे. विविध विषयात गुणानुक्रमे प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना देणगीदारांनी दिलेल्या रकमेतून सुवर्णपदक देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला जातो. अशा एकूण 57 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक देऊन सन्मानित केले जाणार आहे. यामध्ये तब्बल 32 मुली तर 25 मुलांचा समावेश आहे.
मार्च 2022 ला उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे पदवी प्रमाणपत्र संबंधित महाविद्यालयात दीक्षांत सोहळा पार पडल्यानंतर मिळेल, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर यांनी सांगितले. दीक्षांत सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी विद्यापीठ प्रशासनाच्यावतीने विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. सध्या या समित्यांचे काम सुरू आहे.
या पत्रकार परिषदेस प्र-कुलगुरू डॉ. राजेश गादेवार, कुलसचिव योगिनी घारे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर, सीए श्रेणीक शाह, पत्रकारिता विभागाचे प्रमुख डॉ. रविंद्र चिंचोलकर, सहायक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे, जनसंपर्क अधिकारी राहुल वंजारे, डॉ. अंबादास भासके आदी उपस्थित होते.