सोलापूर / अजित उंब्रजकर : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पक्षाने आतापासूनच सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या निवडणुकीचे नेतृत्व आता भाजप यंग ब्रिगेडच्या हाती देण्याच्या विचारात आहे. Solapur. BJP election leadership now in hands of young brigade Kiran Deshmukh Manish Deshmukh Sachin Kalyanshetty Ram Satpute Udayashankar Patil
सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील दोन लोकसभा आणि जास्तीत जास्त विधानसभेच्या जागा तसेच महापालिका जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यासाठी आमदार सचिन कल्याशेट्टी, आमदार राम सातपुते यांच्यासह उदय पाटील, मनीष देशमुख, किरण देशमुख यांच्यावर आगामी काळात मोठी जबाबदारी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही यंग ब्रिगेड भाजपला संपूर्ण जिल्ह्यात वर्चस्व निर्माण करून देणार का याची उत्सुकता लागली आहे.
महापालिका असो पंचायत समिती असो किंवा लोकसभा, विधानसभा निवडणूक असो भाजप प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळी रणनीती आखत असते आणि प्रत्येक निवडणूक जिद्दीने लढत असते अशी पक्षाची ख्याती आहे. त्याचाच एक भाग म्हणून 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये एक हाती सत्ता मिळवण्यासाठी भाजपाने आतापासूनच सुरुवात केली आहे. त्यासाठी प्रत्येक खासदारकीची जागा आणि विधानसभेची जागा भाजपसाठी महत्त्वाची आहे.
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात अकरा विधानसभा आणि दोन लोकसभा मतदारसंघ येतात. या सर्व जागेवर ताबा मिळवण्यासाठी भाजपाने आतापासूनच व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठीच यंग ब्रिगेडला पुढे करण्यात येत आहे. याची सुरुवात आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यापासून करण्यात आली आहॆ.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
शहर आणि जिल्ह्यात अनेक वरिष्ठ नेते असतानाही सचिन कल्याणशेट्टी या युवा नेत्याला पक्षाने जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहॆ. आमदार कल्याणशेट्टी हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. सध्या सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या निर्णय प्रक्रियेतील ते एक सदस्य झाले आहेत. पहिल्यांदाच निवडून आलेल्या कल्याणशेट्टी यांनी या आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात अक्कलकोटमध्ये कोट्यवधीचा निधी आणला आहे. विस्ताराची चर्चा निघाली की आमदार कल्याणशेट्टी यांचे नाव चर्चिले जाते. त्यांच्यावर आगामी काळात सोलापूर लोकसभा तिसऱ्यांदा जिंकण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर येण्याची शक्यता आहे.
आमदार सुभाष देशमुख यांचे चिरंजीव मनीष देशमुख यांच्याकडे ही पक्षाने भाजप युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. सोलापूर शहरात सध्या युवकांचे संघटन करणे, बूथनिहाय मेळावे घेणे यासह पक्षाने दिलेली विविध कामे मनीष देशमुख करताना दिसत आहेत. आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकीत त्यांची भूमिका खास करून दक्षिण मतदार संघात महत्त्वाची मानली जात आहे. या मतदारसंघातून जर जास्तीत जास्त भाजपचे नगरसेवक निवडून आणण्यात त्यांना यश मिळाल्यास आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा दक्षिण विधानसभा मतदारसंघातून विचार होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
माळशिरसचे आमदार राम सातपुतेहेही अल्पकाळात संपूर्ण राज्यात प्रसिद्ध झाले आहेत. तळागाळातील प्रत्येक प्रश्न ते विधानसभेमध्ये पोटतिडकीने मांडताना दिसतात. तेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळेच 2019 मध्ये शेवटच्या क्षणी त्यांना माळशिरसमधून विधानसभेची उमेदवारी देण्यात आल्याचे बोलले जात आहे. एक तळागाळातील आणि जमिनीवरचा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. आता त्यांच्या नावाची चर्चा सोलापूर लोकसभेसाठी ही होत आहे. तसे झाल्यास प्रथमच एका युवा नेत्याला सोलापूर लोकसभेसाठी उमेदवारी मिळणार आहे.
सध्या भाजपमध्ये उदय पाटील यांचे नाव मोठ्या प्रमाणात चर्चेले जात आहे. त्यांचा 21 मार्च रोजी मुंबईमध्ये प्रवेश होत आहे. लिंगायत समाजातील ते एक युवा नेते आहेत. मध्यंतरी त्यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक श्रीकांत भारतीय यांनी भेट देऊन त्यांना पक्षात येण्याचे आमंत्रण दिले होते ते आमंत्रण उदय पाटील यांनी स्वीकारले आहॆ. नवे वर्ष नवे संकल्प अशी सोशल मीडियावर पोस्ट करत उदय पाटील भाजपमध्ये येण्यास सज्ज झाले आहेत. आगामी काळात सोलापूर लोकसभेसाठी भाजप उमेदवाराच्या मागे त्यांना आपली ताकद दाखवावी लागणार आहॆ. येथील यश-अपयशावर त्यांचा आगामी विधानसभेसाठी विचार केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
माजी पालकमंत्र्यांचे चिरंजीव किरण देशमुख यांच्याकडेही शहर उत्तर मधील युवा नेतृत्व म्हणून पाहिले जात आहे. पालकमंत्र्यांचे चिरंजीव ही ओळख करून त्यांनी स्वतःची उत्कृष्ट नगरसेवक म्हणून ओळख निर्माण केली आहे. त्यांनी आपल्या नगरसेवकाच्या फंडातून तसेच आमदार फंडातून अनेक विकास कामे आपल्या प्रभागात केली आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत शहर उत्तरमधून उमेदवारी देताना त्यांची ही भूमिका महत्त्वाची मानण्यात येत आहे. भाजपला बहुमत पुन्हा एकदा महापालिकेत मिळाल्यास जास्तीत जास्त वाटा त्यात शहर उत्तरच असणार आहे. असे झाल्यास महापौर पदासाठीही ऐन वेळेला किरण देशमुख यांचे नाव पुढे येईल असे बोलले जात आहॆ.