○ मुख्यमंत्री बदलण्याच्या चर्चेने मुख्यमंत्री नाराज, सुट्टी घेऊन तडकाफडकी गावी निघून गेले
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपला अपेक्षित अशी कामगिरी करता न आल्याने दिल्लीत पडद्यामागे मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली सुरु आहेत, असे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले होते. राऊतांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. Chief Minister Eknath Shinde roamed the fields, appealed to make Mahabaleshwar, Pachgani plastic free. ही सगळी चर्चा सुरु असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज होऊन साताऱ्याला त्यांच्या गावी निघून गेल्याची आणखी एक वदंता राजकीय वर्तुळात पसरली आहे. भाजपकडून पडद्यामागून अजित पवार यांच्याशी सुरु असलेल्या वाटाघाटी आणि मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली या बातम्यांमुळे एकनाथ शिंदे हे नाराज झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे त्यांनी तडकाफडकी तीन दिवसांसाठी साताऱ्याला जाण्याचा निर्णय घेतला, अशी कुजबूज सुरु आहे. या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण देत हा दावा फेटाळून लावला आहे.
उदय सामंत हे मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज होऊन गावाला निघून गेले आहेत का, असे विचारण्यात आले. त्यावर उदय सामंत यांनी म्हटले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावची जत्रा आहे. ते गावच्या जत्रेला गेले आहेत. गावच्या जत्रेला गेल्यावरही मुख्यमंत्री नाराज आहे असं कुणी म्हणत असेल, तर त्यांचा नागरी सत्कार त्यांच्याच जत्रेत केला पाहिजे, असे उदय सामंत यांनी म्हटले.
संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली सुरु असल्याचा दावा केला होता. भाजपला मविआचे सरकार पाडायचे होते. त्यासाठी एकनाथ शिंदेंचा वापर झाला, ते काम पूर्ण झाले आहे. पण राजकीयदृष्टया भाजपला महाराष्ट्रात ताकद देण्यात हे मुख्यमंत्री अपयशी ठरले आहेत. त्यामुळे आता दिल्लीत मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत, असा दावा संजय राऊत यांनी केला होता. यावरुन राजकीय वर्तुळात बराच गदारोळ झाला होता. ही सगळी चर्चा सुरु असताना एकनाथ शिंदे हे आश्चर्यकारकरित्या तीन दिवसांची सुट्टी घेऊन साताऱ्यातील त्यांच्या गावी निघून गेले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
सूत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे तीन दिवसांसाठी गावी जाणार, असा कोणताही कार्यक्रम ठरला नव्हता. परंतु, जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांशी झालेल्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गावी जात असल्याचा संदेश पाठवला. एकनाथ शिंदे हे २४ ते २६ एप्रिल हे तीन दिवस गावी असणार आहेत. महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व कार्यक्रम रद्द करून गावाला निघून गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
‘न्यू इंडियन एक्स्प्रेस’ च्या वृत्तानुसार, भाजप पडद्यामागून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याशी ज्याप्रकारे चर्चा करत आहे, ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फारसे पसंत नाही. भाजपच्या ठरवलेल्या अजेंड्यानुसार आणि रणनीतीनुसार सर्वकाही व्यवस्थित सुरु असताना भाजपकडून पडद्यामागे अजित पवार यांना हाताशी धरून वेगळ्या राजकीय समीकरणांची आखणी सुरु आहे. या टप्प्यावर अशा काही राजकीय घडामोडी घडतील, याची अपेक्षा एकनाथ शिंदे यांना नव्हती. त्यामुळे एकनाथ शिंदे हे नाराज होऊन तीन दिवसांसाठी गावी निघून गेल्याचे वृत्त आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या साताऱ्यातल्या दरे या गावी पोहोचले आहेत. मुख्यमंत्री त्यांच्या गावी दोन दिवस मुक्काम करण्याची शक्यता आहे. त्यांचा शेतातील एक व्हिडिओ समोर आला आहे. यात शिंदे शेतातील वेगवेगळ्या झाडांची माहिती देताना दिसत आहेत. शेतामध्ये आपण आंबा, चिकू, स्ट्रॉबेरी, मोसंबीची झाडे लावली आहेत. या सगळ्या झाडांसाठी सेंद्रीय खतांचा वापर करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
दरम्यान, प्लास्टिक हे आरोग्यासाठी हानिकारक असल्यामुळे महाबळेश्वर व पाचगणी या पर्यटनस्थळांना प्लास्टिक मुक्त करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. महाबळेश्वरमध्ये मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी महाबळेश्वरमध्ये मंजूर झालेल्या कामांच्या लवकरात लवकर निविदा काढण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला केल्या. प्लास्टिक हानिकारक असल्याचे शिंदे म्हणाले.