○ वनमंत्र्यांनी दिले चौकशी करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश
पंढरपूर – वारकरी संप्रदायासाठी तीर्थक्षेत्र पंढरपुरातील यमाई तलावालगत तुळशी वृंदावन आणि संतांची संगमरवरी दगडामध्ये मंदिरे उभारण्यात आली आहेत. यामुळे वारकऱ्यांना एकाच ठिकाणी सर्व संतांचे दर्शन घेता येत होते. Shoddy work: Pandharpur Tulsi temple in Vrindavan collapses for the second time in a few days Solapur मात्र काही दिवसातच दुसऱ्यांदा संतांचे मंदिर कोसळल्याने या तुळशी वृंदावनाच्या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याची बाब समोर आली आहे.
दक्षिण काशी असलेल्या पंढरी नगरीमध्ये विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून येणाऱ्या लाखो भाविकांना पंढरपूर मध्ये विठुरायाला प्रिय असलेले विविध तुळशी पाहण्यास मिळाव्यात याचबरोबर संतांचे दर्शन घडावे यासाठी वन विभागाने २०१९ मध्ये पंढरपूर मध्ये साडेचार कोटी रुपये खर्चून तुळशी वृंदावन उभे केले आहे. यासाठी प्रवेश शुल्कही आकारण्यात आले तरीदेखील भाविक आणि पर्यटकातून मोठा प्रतिसाद मिळत असताना आता निकृष्ट कामाचे परिणाम दिसू लागले आहेत.
संत चोखामेळा यांच्या मंदिरानंतर आता संत एकनाथ महारांजांचे मंदिरही कोसळले आहे.
काही दिवसातच दुसरे संतांचे मंदिर कोसळल्याने भाविकांमध्ये प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे.
काही दिवसांपूर्वी याच तुळशी वृंदावनातील संत चोखामेळा यांचे मंदिर कोसळल्यावर अनेक पक्ष व संघटनांनी संबंधितांवर कारवाई करावी, तात्काळ मंदिर उभारावे, इतर मंदिरांचे ऑडिट करावे अशी मागणी केली होती तर आमदार समाधान आवताडे यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. यानंतर वन विभागाने आता बाकीच्या मंदिराची तपासणी करून डागडुजी करू, असे आश्वासन दिले होते. मात्र हे आश्वासन पूर्ण होण्याच्या आताच आज दुसरे मंदिर कोसळल्याने कामाचा दर्जा निकृष्ट असल्याची बाब समोर आली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
याबाबत श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी पाहणी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याचबरोबर शिवसेना ठाकरे गट देखील आक्रमक झाला आहे. आमच्या भावना दुखावल्या असून संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
या उद्यानात श्रीयंत्राच्या आठ कोपऱ्यात आठ संतांची मंदिरे उभारण्यात आला होती . आता यातील दोन मंदिरे कोसळली आहेत. तर आता उरलेल्या सहा मंदिरांचे अस्तित्व देखील धोक्यात आले आहे . सध्या संत ज्ञानेश्वर , संत तुकाराम , संत सावता माळी , संत जनाबाई , संत कान्होपात्रा आणि संत नामदेव यांचीच मंदिरे याठिकाणी उरली आहेत . या घटनेनंतर तातडीने वनविभागाने तुळशी वृंदावनाच्या बाहेर डागडुजीसाठी उद्यान बंद ठेवल्याचा फलक लावला आहे. मात्र त्यानंतरही आता वन विभागाने उरलेल्या संतांच्या मंदिरातील मुर्ती तातडीने हलवून त्यांची दुरुस्ती न केल्यास अजून पुढचे अनर्थ घडण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
○ वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले चौकशी करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश
तुळशी वृंदावन येथील संत एकनाथ महाराज यांचे मंदिर कोसळल्याची बाब अत्यंत गंभीर असून तात्काळ अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून सर्व बांधकामाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून पंधरा दिवसात अहवाल सादर करावा यामध्ये बांधकामाचा निकृष्ट दर्जा निदर्शनास आल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.