मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक प्रदेश कार्यालयात सुरू झाली आहे. या बैठकीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पक्षाध्यक्षपदाच्या राजीनाम्यासंदर्भातील ठराव मांडण्यात आला आहे. परंतु पवारांचा राजीनामा निवड समितीने फेटाळला आहे. त्यामुळे पवारच पक्षाचे अध्यक्ष राहतील असे समजत आहे. दरम्यान, जो निर्णय समिती घेईल तो मान्य असेल असे पवारांनी म्हटले होते. Sharad Pawar’s resignation was rejected by the selection committee, Sharad Pawar should remain the president, political withdrawal signal
राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक प्रदेश कार्यालयात पार पडली. त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली. शरद पवारच पक्षाचे अध्यक्ष राहावे, असा प्रस्ताव आज राष्ट्रवादीच्या निवड समितीने मंजूर केला आहे. पवारांनी आता आपला राजीनामा मागे घ्यावा, अशी विनंती करण्यासाठी आम्ही त्यांची भेट घेणार, असे पटेल यांनी सांगितले.
शरद पवार यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा नामंजूर करण्याचा निर्णय आज राष्ट्रवादीच्या कमिटीने घेतला आहे. मात्र पवार या कमिटीचा निर्णय मान्य करतील का ? हा अजूनही प्रश्न आहे. मात्र निवृत्तीची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांनी पवारांनीच अध्यक्ष राहावे, अशी विनंती केल्याने कमिटीचा अंतिम निर्णय मान्य असेल, असे पवार यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे आता पवारांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष आहे.
‘लोक माझे सांगाती’ याच्या सुधारीत आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली होती. शरद पवारांच्या घोषणेनंतर सभागृहात एकच गदारोळ झाला. साहेब निर्णय मागे घ्या, कार्यकर्त्यांनी मागणी करत ठिय्या दिला होता. तेव्हापासूनच शरद पवारांनी आपला निर्णय मागे घ्या, असा कार्यकर्त्यांचा आग्रह होता. शरद पवारांनी त्यावेळी चेंडू राष्ट्रवादीच्या सदस्य समितीच्या कोर्टात टोलावला होता. त्यामुळे समितीनं राजीनामा फेटाळल्यानंतर शरद पवार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाबाहेर सकाळपासूनच कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती. सध्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड गोंधळ पाहायला मिळत आहे. कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. अशातच एका कार्यकर्त्यानं प्रदेश कार्यालयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांकडून कार्यकर्त्यांना शांत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही कार्यकर्त्यांना वारंवार शांत राहण्याचं आवाहन करत आहेत. दरम्यान, शरद पवारांचं मुंबईतील निवासस्थान ‘सिल्वर ओक’वर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
○ कालच मिळाले होते संकेत
शरद पवार यांचे माघारीचे संकेत कालच मिळाले होते. पक्षाच्या भवितव्यासाठी मी निर्णय घेतला. नवं नेतृत्व तयार करण्याच्या दृष्टीने मी संबंधित निर्णयापर्यंत पोहोचलो. पण माझ्या घोषणेनंतर पक्षातल्या सगळ्या सहकाऱ्यांची तीव्र भावना आहे. तुमच्या भावनांचा आदर करुन मी येत्या २ दिवसांत अंतिम निर्णय घेईन. तुमच्या भावना दुर्लक्षित होणार नाही, याची खरबरदारी घेईन. त्याचवेळी तुम्हाला २ दिवसांनी असं पायऱ्यांवर आंदोलनाला बसावं लागणार नाही, असं सांगत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माघारीचे संकेत देऊन पुन्हा अध्यक्षपद स्वीकारेन, असंच अप्रत्यक्षरित्या सांगितल्याचं बोललं जातंय.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आणि राज्यभरातील युवक, युवतींच्या पदाधिकारी वाय. बी. चव्हाण येथे आंदोलनाला बसले होते. शरद पवार यांनी आपला निर्णय माघारी घ्यावा, यासाठी ते मनधरणी करत होते. काल गुरुवारी त्याच पदाधिकाऱ्यांशी शरद पवार यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी माझ्या निर्णयाचा फेरविचार करुन सहकाऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन योग्य निर्णय घेईन, असं सांगितलं.