》110 दिवसांचा 2.43 लाख रुपये निधी शिक्षण मंडळाकडे वर्ग
सोलापूर : सोलापूर महापालिका महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत प्रोत्साहन म्हणून महापालिका शाळेतील 1 हजार 109 विद्यार्थिनींना यावर्षीच्या 110 दिवसांचा शाळा उपस्थिती भत्ता देण्यात येणार आहे. Municipal school girls will soon get attendance allowance under Solapur education board class fund त्यासाठी 2 लाख 43 हजार 980 रुपये निधी महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी यांच्या अकाउंटवर पाठविण्यात आला आहे. त्यानंतर त्या त्या शाळेच्या मुख्याध्यापकांमार्फत विद्यार्थिनींना तो मिळणार आहे.
महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त विद्या पोळ व सहाय्यक आयुक्त पुष्पगंधा भगत यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका महिला व बालकल्याण विभागांतर्गत विविध 17 नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येत आहेत. त्यापैकी सोलापूर महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या अंतर्गत असलेल्या महापालिकेच्या विविध माध्यमांच्या शाळांमधील 1 हजार 109 विद्यार्थिनींना प्रोत्साहन म्हणून दररोज 2 रुपये प्रमाणे शाळा उपस्थिती भत्ता शासन नियमानुसार देण्याची योजना आहे.
महापालिका शाळेतील विद्यार्थिनींना प्रोत्साहन मिळावे म्हणून या योजनेअंतर्गत महापालिकेच्या विविध माध्यमांच्या एकूण 61 शाळांमधील 1 हजार 109 विद्यार्थिनींना हा 110 दिवसांचा शाळा उपस्थिती भत्ता या शैक्षणिक वर्षात मिळणार आहे. दरम्यान, दररोज दोन रुपये प्रमाणे हा उपस्थिती भत्ता देण्यात येणार आहे.
रोज 2 रुपये प्रमाणे प्रत्येक विद्यार्थिनीस प्रति महिना 60 रुपये प्रमाणे यावर्षी माहे डिसेंबर 2022 ते मार्च 2023 या दरम्यानचा 110 दिवसांचा उपस्थिती भत्ता मिळणार आहे. त्यासाठी 2 लाख 43 हजार 980 रुपये निधी महापालिका लेखापाल विभागाकडून महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी यांच्या अकाउंटवर पाठविण्यात आला आहे.
■ शाळांनिहाय मुख्याध्यापकांकडे 2 दिवसांत रक्कम वर्ग होईल : प्रशासनाधिकारी जाधवर
महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळ प्रशासनाकडून शाळांनिहाय मुख्याध्यापकांच्या अकाउंटवर 2 दिवसांत वर्ग करण्यात येणार आहे. त्यानंतर हा उपस्थिती भत्ता त्या त्या शाळांच्या विद्यार्थिनींना वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी हनुमंत जाधवर यांनी दिली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 श्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शुक्रवारी सोलापुरात पालखी सोहळा
● सकल हिंदू समाजातर्फे आयोजन
सोलापूर : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपति श्री शिवाजी महाराजांच्या ३५० व्या श्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त अर्थात हिंदूसाम्राज्य दिनानिमित्त सकल हिंदू समाजातर्फे शुक्रवारी (२ जून) पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती रंगनाथ बंकापूर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून हिंदूसाम्राज्य दिन महोत्सव समितीतर्फे हा कार्यक्रम होणार आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकातून शुक्रवारी (दि. २ जून) दुपारी ४ वाजता या पालखी मिरवणुकीस प्रारंभ होईल. येथून ही पालखी मिरवणूक मेकॅनिक चौक, सरस्वती चौक, रेवणी मारुती मंदिर, दत्त चौक, नामदेव चिवडा, चौपाड विठ्ठल मंदिरमार्गे शिवस्मारकच्या मैदानात विसर्जित होईल. या पालखी मिरवणुकीच्या अग्रभागी भगवा ध्वज असेल. त्यामागे शस्त्रपथक असेल.
त्यामध्ये शिवकालीन मर्दानी खेळ सादर होणार आहेत. त्यामागे लेझीम पथक, ढोल पथक, विविध चित्ररथ राहतील. यानंतर छत्रपति श्री शिवरायांची पालखी असणार आहे. मार्गावरील पाच मंदिरांचे दर्शन घेऊन पालखी मिरवणूक मार्गस्थ होईल. या पालखी मिरवणुकीत हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सकल हिंदू समाजातर्फे करण्यात आले आहे.
श्री शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त सोलापूरात हिंदूसाम्राज्य दिन महोत्सव समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून शिवस्मारकतर्फे वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यात निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, छत्रपति श्री शिवरायांवरील चित्रपट महोत्सव, व्याख्याने आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे, असेही सांगण्यात आले.
या पत्रकार परिषदेस ओंकार चराटे, जयदेव सुरवसे, महेश धाराशिवकर, संजय साळुंखे, दत्तात्रय पिसे, नागेश बंडी, अंबादास गोरंटला, रवी गोणे आदी सकल हिंदू समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.