● राजकीय पक्षांची पदाधिकारी निवडीसाठी शोधमोहीम सुरु
• सोलापूर / शंकर जाधव
राज्यात लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. एका पाठोपाठ या निवडणुकांचा धुराळा उडणार आहे. यामुळे राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांचा एकच गलका सुरू होणार आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांमध्ये पदाधिकारी निवडीची उलथापालथ सुरू आहे. Solapur famous bread… turn the bread… but where is the hearth! Shiv Sena BJP Nationalist Politics MIM
येत्या महिना-दीड महिन्यात विशेषतः: सोलापूर शहर जिल्ह्यातील भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची उलथापालथ होणार आहे. अर्थात अलीकडे रूढ होत असलेला ‘भाकरी फिरवणे’ हे शब्द राजकीय पक्षांच्या नेत्यांनी बराच शोध लावून बाहेर काढले आहेत. कुठे जाईल तेथे राजकीय नेत्यांच्या तोंडी हे शब्द ऐकावयास मिळत आहे. खरतर भाकरी फिरवणे ही तितकी सोपी गोष्ट नसली तर ती राजकीय नेत्यांना चांगलीच जमत आहे. ते भाकरी फिरवण्याच्या मूडमध्ये आहेत. पण चुलीत विस्तवच नाही… त्यामुळे तवा तापेना… अशा स्थितीत तव्यावरील भाकरी कशी फिरवणार… ?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अगदी अशीच स्थिती सोलापूर शहर – जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपामध्ये झाल्याचे दिसून येत आहे.
आता भाजपाचेच घ्या ना. इतर
पक्षाप्रमाणे भाजपानेही लोकसभा
मतदारसंघनिहाय जिल्हाध्यक्ष सुरुवातीला आमदार सचिन
नेमण्याचे धोरण आखले आहे. कल्याणशेट्टी यांची सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. त्याप्रमाणे आ. कल्याणशेट्टी यांनी जिल्हाध्यक्ष पदाला न्याय देण्याचा प्रयत्नही केला. पण अलीकडील काळात त्यांनी आमदारकी असल्याने जिल्हाध्यक्ष म्हणून पदाला न्याय देऊ शकत नसल्याची भावना व्यक्त करून जिल्हाध्यक्ष पदासाठी ‘ना…ना’ ची भाषा सुरू केली आहे. त्यामुळे सोलापूर लोकसभेसाठी भाजपाला नवा जिल्हाध्यक्षाचा शोध घ्यावा लागणार आहे. सोलापूर लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून विक्रम देशमुख यांची नियुक्ती झाल्याने त्यांच्या सल्लामसलतीवरच सोलापूर लोकसभेचा जिल्हाध्यक्ष नियुक्त केला जाणार असल्याचे संकेत आहेत.
इकडे माढा लोकसभा मतदारसंघ जिल्हाध्यक्षपदासाठीही भाजपाला शोधमोहीम हाती घ्यावी लागणार आहे. या मतदारसंघासाठी भाजपाचे माजी आ. प्रशांत परिचारक यांच्या खांद्यावर निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे येथे जिल्हाध्यक्ष नेमताना मोहिते-पाटील यांच्याबरोबरच परिचारक यांचीही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. माढा लोकसभेच्या जिल्हाध्यक्षपदासाठी धैर्यशील मोहिते-पाटील यांचे नाव तसे आघाडीवर आहे. पण आता त्यांच्यावर माळशिरस विधानसभा मतदारसंघाची निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या जिल्हाध्यक्ष निवडीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
जिल्हाध्यक्ष निवडीत भाजपापुढे जसा पेच उभा राहिला आहे. तसा सोलापूर शहराध्यक्ष निवडीच्या बाबतीत भाजपापुढे पेच उभा राहिला आहे. विद्यमान शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांची मुदत मार्चमध्ये संपली असली तर तेच शहराध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. आता त्यांची पुढची पायरी म्हणून सोलापूर लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे ते शहराध्यक्ष पदावरून मुक्त होणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. आता त्यांच्या जागी दोन देशमुख आमदारांच्या सल्ल्याने शहराध्यक्ष निवडला जाणार आहे. पण दोन्ही देशमुख आपापल्या गटातील कार्यकर्त्याचे घोडे पुढे दामटीत आहेत. या त्यांच्या वादात प्रदेश भाजपा शहर कार्यकर्त्यांचा कानोसा घेऊन शहराध्यक्ष नियुक्त करण्याचा शक्यता आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
शहराध्यक्ष पदासाठी चन्नवीर चिट्टे, हेमंत पिंगळे, नरेंद्र काळे, अनंत जाधव, पांडुरंग दिड्डी यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यात वरिष्ठ पातळीवर चन्नवीर चिठ्ठे यांचे पारडे सध्या तरी जड झाले आहे. कारण ते दोन देशमुखांच्या कुठल्याच गटाशी बांधील नाहीत.
आता हा प्रकार सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमधला. जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे हे प्रकृतीच्या कारणांमुळे गेल्या वर्षभरापासून जिल्हाध्यक्ष पदापासून आपली सुटका करा, असे म्हणत आहेत. पण राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी बांधून ठेवले आहे. त्यामुळे पक्षीय काम न करता ते केवळ नावापुरते पदावर आहेत. जिल्ह्यातील राष्ट्रवादीत ताळमेळ नसल्याने व नजीकच्या निवडणुकीत कोण कुठल्या पक्षात उडी मारेल याची शाश्वती नसल्याने वरिष्ठ नेत्यांचा कुणावर विश्वास राहिला नाही. विशेष म्हणजे जिल्हाध्यक्ष पदासाठी कुणी उत्साह दाखवून पुढेही येईना. त्यामुळे जिल्हाध्यक्ष पदाचे राष्ट्रवादीचे भिजत घोंगडे आहे.
जिल्ह्याच्या राष्ट्रवादीत जशी गोंधळाची स्थिती आहे. तशी शहर राष्ट्रवादीमध्येही आहे. पण गुपचूप… गुपचूप!, शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष भारत जाधव हे गेल्या सहा वर्षापासून अध्यक्षपदावर ठाण मांडून आहेत. सुरुवातीला त्यांचे अस्तित्व जाणवत नव्हते. पण शहरासाठी कार्याध्यक्ष म्हणून संतोष पवार यांची नियुक्ती होताच त्यांची शहरात पक्षाच्या कार्यक्रमावर जोर दिला. त्यामुळे त्यांच्या साथीने भारत जाधव यांचे महत्त्व वाढले. नंतर संतोष पवार यांची प्रदेश पातळीवर वर्णी लागल्याने त्यांनी शहरातून अंग काढून घेतले.
दरम्यान माजी महापौर महेश कोठे, अॅड. यु. एन. बेरिया, सुधीर खरटमल यांचे महत्त्व पक्षात वाढल्याने राष्ट्रवादीचे जुने जाणते नाराज होऊ लागले. त्यात भारत जाधवही आहेत. नजीकच्या काळात माजी महापौर महेश कोठे यांच्या हाती शहराची राष्ट्रवादी केंद्रित होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पूर्वी काँग्रेसमध्ये ‘कोठे ठरवेल ती पूर्वदिशा’ होती, अगदी तशीस स्थिती राष्ट्रवादीत होण्याचे संकेत आहेत. त्यामुळेच भारत जाधव यांनी १५ दिवसांपूर्वी गुपचुपपणेच आपल्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा प्रदेश श्रेष्ठींकडे पाठवून दिला आहे. तसे त्यांना शहराध्यक्ष पदावरून हटवून त्यांच्या जागी सुधीर खरटमल, अॅड. यु. एन. बेरिया यांच्यापैकी एकाची किंवा आता नव्यानेच स्पर्धेत ओढून ताणून आणलेले बिज्जू प्रधाने यांची वर्णी लावण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. पाहूया, राष्ट्रवादीची शहराध्यक्ष पदाची लॉटरी कुणाला लागणार आहे ते, पण महेश कोठे यांच्या सांगण्यानुसारच लॉटरी फुटणार आहे, एवढे मात्र निश्चित.
काँग्रेसमध्ये शहर जिल्ह्यात भाकरी तशी चांगलीची फिरली आहे. शहरात चेतन नरोटे आपला जम बसवित आहेत तर जिल्ह्यात धैर्यशील मोहिते-पाटील. जिल्ह्यात तालुकाध्यक्ष निवडीवरून थोडा अकांडतांडव झाला पण त्यावर पडदा पडला असला तरी अधूनमधून नाराजीची सूर ऐकावयास मिळत आहेत. यामुळे जिल्हा काँग्रेसमध्ये आजही ‘रुसवे-फुगवे’ तग धरुन आहेत.
तसं शिवसेनेच्या दोन गटांपैकी ठाकरे गटाची सूत्रे पुरुषोत्तम बरडे आणि गणेश वानकर हलवित आहेत. तर शिंदे गटाची सूत्रे अमोल शिंदे, मनिष काळजे, मनोज शेजवाल आहेत. त्यावर संपर्क म्हणून प्रा. शिवाजी सावंत सूत्रे हलवित आहेत. या दोन गटात सध्या ‘हाड- वैर’ आहे. पाहुया निवडणुकीत याची प्रचिती येते का? पण या दोन्ही गटाने फिरवलेली भाकरी मात्र सध्या तरी ‘फिट्ट’ बसली आहे.
एमआयएममध्ये सारे काही अलबेलच म्हणावे लागेल. नगरसेवक तौफिक शेख यांनी आपल्या पाच समर्थक नगरसेवकांना घेऊन राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने एमआयएममध्ये अस्वस्थता असली तरी ‘वजनदार’ नेते म्हणून उदयास आलेले फारुक शाब्दी पक्षावर लक्ष ठेवून आहेत. पण तरीही एमआयएममध्ये इतना सन्नाटा क्यू है भाई’ अशी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे. येथे पदाधिकारी निवडीची भाकरी फिरवण्याची भाषाच होत नाही, हे विशेष.
बाकी वंचित बहुजन आघाडी, रिपाइंचे विविध गट, आम आदी पार्टी यांच्यात भाकरी फिरवण्याचा प्रकार अद्याप तरी पुढे आला नाही. बघुया, आता नजीकच्या काळात कोण, कशी कणीक मळणार, चूल पेटवणार, तवा गरम करणार आणि पाणी लावून भाकरी फिरवणार?. पण काही का असेना सोलापूर फेमस भाकरी या निमित्ताने राजकारणात तरी चर्चेला आली, हे विशेष.