》येत्या तीन महिन्यात विमान उडणार
सोलापूर : श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या को- जनरेशनच्या चिमणी पाडकामासाठी ठेकेदारावर झालेला खर्च, दोन दिवसात आवश्यक यंत्रणा उपलब्ध करून देण्यावर झालेला खर्च आणि परजिल्ह्यातून मागविलेला पोलिस बंदोबस्त असा एकूण तीन-साडेतीन कोटींच्या घरात गेला आहे. हा खर्च महापालिका कारखान्याकडून वसूल करणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. Chimney demolition work will be recovered by Municipal Corporation, costing nearly three crores, Solapur Dharmaraj Kadadi
सिध्देश्वर साखर कारखान्याच्या को जनरेशन चिमणी पाडकामासाठी महापालिकेने ४५ दिवसांची मुदत दिली होती. मुदतीत चिमणी पाडकाम न केल्यास महापालिका वसूल करेल, असे आदेशात म्हटले आहे. मात्र कारखान्याने मुदतीत चिमणी पाडली नसल्याने महापालिकेने पोलीस प्रशासनाच्या मदतीने ही चिमणी पाडली. आता यासाठी आलेल्या खर्चावरून पुन्हा महापालिका आणि कारखाना प्रशासन यांच्यात कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे. मंगळवारपासून महापालिका आणि पोलीस प्रशासनाची यंत्रणा कामाला लागली. तीन दिवस पाडकामाची मोहीम सुरू होती.
पाडकामासाठी महापालिकेने बंगळुरू येथील बिनियास कंपनीला १ कोटी १७ लाखाचा मक्ता दिला होता. तसेच दोन दिवसांत विविध विभागांतून आवश्यक असलेली यंत्रणा, कर्मचाऱ्यांचे जेवण, पाणी व आवश्यक साहित्य या सर्व गोष्टींवर साधारण २५ लाखांचा खर्च झाल्याचे सांगण्यात आले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
२०१७ मध्येही चिमणी पाडकामाच्या कारवाईसाठी बेंगलोरच्या मक्तेदाराला नऊ लाखांचा ॲडव्हान्स दिला होता. महापालिका प्रशासनाचा चिमणी पाडकामावर साधारण दीड कोटी इतका खर्च झाला आहे. कारखाना स्थळासह विविध ३० ते ३५ ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यासाठी नाशिक, जळगाव, नवी मुंबई, जालना, बीड अशा विविध जिल्ह्यांतून पोलिसांचा मोठा फौजफाटा मागविण्यात आला होता.
या बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांचे भोजन, पाणी, वाहतूक आदींचा खर्च साधारण ५० लाखांच्या घरात आहे. एकंदरीत चिमणी पाडकामासाठी सर्व विभागाचा मिळून तीन- साडेतीन कोटींचा खर्च आला आहे. महापालिका आता हा खर्च कारखान्याकडून वसूल करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
● खर्चाच्या आकड्याची गोळाबेरीज सुरू
चिमणी पाडकामाच्या खर्चाची ही रक्कम कारखान्याकडून वसूल करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. यापूर्वी आदेशात महापालिकेने तसे नमूदही केले आहे. चिमणी पाडकामावर झालेल्या खर्चाच्या आकड्याची गोळाबेरीज महापालिकेत त्या – त्या विभागाकडून केली जात आहे. त्याचे काम सुरू झाले आहे.
● एक-दोन कोटी फार विशेष नाही : धर्मराज काडादी
शासन व प्रशासनाने चिमणी पाडून माझे दीड हजार कोटींचे नुकसान केले आहे. त्यात एक-दोन कोटी फार विशेष नाही.. त्यांची नोटीस आल्यानंतर त्याच्यावर कायदेशीर सल्ला घेण्यात येईल. त्यानंतर पुढील निर्णय असणार आहे, असे धर्मराज काडादी यांनी सांगितले.
》येत्या तीन महिन्यात विमान उडणार!
सोलापूरच्या सुसज्ज असणाऱ्या होटगी रोड विमानतळावरून येत्या तीन महिन्याच्या आत नागरी विमान सेवा सुरू होणार आहे. असा दावा सोलापूर विकास मंचने शनिवारी केला आहे. सोलापूर विमानतळाचे प्रमुख बानोत चॅम्पला यांनी सोलापूर विचार मंचच्या सदस्यांना भेटीदरम्यान सांगितल्याचे मंचच्या सदस्यांनी म्हटले आहे.
होटगी रोड विमानतळाशेजारील फक्त श्री सिद्धेश्वर कारखान्याच्या ९२ मीटर उंचीची अनधिकृत को-जनरेशनच्या चिमणीचा अडथळा असल्याने येथून नागरी विमान सेवा सुरू होत नव्हती परंतु १५ जूनला ही चिमणी जमीन दोस्त झाल्यानंतर या विमानतळाचे डीजीसीएकडून ऑपरेशनल लायसन्स मिळण्याची तयारी अत्यंत युद्ध पातळीवर सुरू आहे व येत्या तीन महिन्याच्या – आत सोलापुरातून ही विमानसेवा खात्रीलायकरीत्या सुरू होईल असे सोलापूर विमानतळाचे प्रमुख श्री बानोत चॅम्पला यांनी सोलापूर विचार मंचच्या सदस्यांना सांगितले.
होटगी रोड विमानतळावर बहुतांश सर्व सोयी उपलब्ध असून चिमणीच्या बाजूच्या धावपट्टीचा अहवाल दोन दिवसापूर्वीच डीजीसीएला पाठवलेला आहे व विरुद्ध दिशेचा अहवाल सोमवारी पाठवला जाईल व त्यानंतर डीजीसीएकडून विमानतळास परवानगी मिळेल.
सोलापूर विमानतळाची सध्याची धावपट्टी ही २.१ किलोमीटरची असून त्यावरून ७२ आसनी आरटीआर विमाने सेवा देतील. आजच नागरी उड्डान मंत्रालय, डीजीसीए व एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाला तातडीचे ईमेल करून येथून पहिल्या टप्प्यात मुंबई, दिल्ली, हैदराबाद, बेंगलोर, चेन्नई व तिरुपती अशा ठिकाणी विमान सेवा सुरू करावी अशी विनंती करण्यात आली असल्याचे डॉ. संदीप आडके यांनी सांगितले. विचार मंचचे संजय थोबडे, विठ्ठलराव वठारे व लिंगराज गडुर हे या भेटीदरम्यान उपस्थित होते.
त्यामुळे चिमणी पडली आता विमानसेवेचे काय ? या प्रश्नाला सोलापूर विचार मंच द्वारे कृती करून उत्तर देण्यात आले आहे. त्यामुळे चिमणी व्यतिरिक्त अन्य १०५ अडथळे आहेत, होटगी रोड विमानतळ व त्याची धावपट्टी छोटी आहे. त्याचे विस्तारीकरण होऊ शकत नाही अशा अफवांना आता पूर्णविराम मिळाला आहे.