:::::::::::::::::::
शेत जमीन कसण्याच्या वादातून सत्तुरने सपासप वार
माढा तालुक्यातील बुद्रुकवाडीत कांतीलाल मानेंचा खून
: शेती कसण्याच्या विरोधाने गाठली क्रौर्याची परसिमा
: विहिरीच्या काठी शुक्रवारी रात्री बटईदार शेतकर्याची हत्या
: संशयित आरोपी भिवा बुद्रुक घटनेनंतर फरार
: संशयित आरोपीच्या अटकेवरुन माढा पोलिस ठाण्यात तणाव
: घरचा कर्ता गेल्याने कुंटुंब पडलं अक्षरश: उघड्यावर
माढा प्रतिनिधी : माढा तालुक्यातील बुद्रुकवाडी येथे शेतजमिनीच्या वादातून कांतीलाल ज्ञानदेव माने (वय 52 वर्ष) या शेतकर्याचा सत्तुर व काठीने मारहाण करून खून केला असल्याची घटना घडली असून याबाबत संशयित आरोपी भिवा संपत्ती बुद्रुक याच्यावर मृताची पत्नी अनुराधा कांतीलाल माने (वय 32) यांनी माढा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन माढा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आला आहे. शेती बटईने कसण्याच्या वादातून मृतावर सत्तुरने सपासप वार केल्याचे उघड झाले आहे. शेती कसण्याच्या विरोधाने क्रौर्याची परसिमा संशयित आरोपींने गाठल्याचे खुनाच्या घटनेनंतर स्पष्ट झाले आहे. खुनातील संशयित आरोपी भिवा बुद्रुक हा फरार झाला आहे. त्याच्या अटकेसाठी मृताच्या नातेवाईकांनी माढा पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता. यावरुन येथे काहीकाळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
याबाबतची अधिक पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी, मृत कांतीलाल माने हे मानेगाव येथील संदीप भूजंगराव पाटील यांची बुद्रुकवाडी येथील जवळपास 10 एकर शेती गेली 10 वर्षापासून बटईने करून आपला उदरनिर्वाह करीत होते.
या शेतात एक सामाईक विहिर असल्याने त्या विहिरीमध्ये संदीप पाटील यांच्यासह आरोपी भिवा बुद्रुक यांचाही हिस्सा होता.भिवा बुद्रुक हा वारंवार ‘तु ही जमीन करायची नाही,तु विहिरीवरची मोटार चालू करायची नाही, तुझा यात काय संबंध नाही अन्यथा तूला जिवे मारीन’ अशी धमकी देत वारंवार भांडत होता.
दरम्यान शनिवारी 22 मार्चच्या रात्री रात्रपाळीची लाइट असल्याने कांतीलाल माने हे पिकाला पाणी द्यायला नेहमी प्रमाणे गेले होते. सकाळी ते परत न आल्याने सहा वाजण्याच्या दरम्यान पत्नी अनुराधा शेतात गेली असता शेतातील विहिरीजवळ कांतीलाल माने रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले.त्याच्याजवळ लोखंडी कोयता व काठी पडलेली होती. त्यामुळे भिवा संपत्ती बुद्रुक यानेच कांतीलाल माने यांच्या गळ्यावर, डोकीत व कपाळावर कोयत्याने वार करून ठार मारले असल्याची फिर्याद अनुराधा माने यांनी माढा पोलिस ठाण्यात दिली आहे. संबंधीत आरोपीवर अट्रॅसिटी व खुनाच्या गुन्ह्यांतर्गत तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपी फरार असल्याने माढा पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.
घटनेचे गांभीर्य पाहता पोलिस उपविभागिय अधिकारी जालिंदर नालकूल यांनी घटनास्थळाला भेट दिली. दिवसभर झाल्या प्रकाराबद्दल तपासणी करून गुन्हा दाखल केला आहे.
आरोपीच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यात नातेवाईकांचा ठिय्या
घटनेमधील आरोपीस तातडीने अटक करणेसाठी नातेवाईक आणि वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यात गर्दी केली होती.आरोपीस अटक होईपर्यंत प्रेत ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली होती. यासाठी काही काळ पोलीस स्टेशन समोर ठिय्याही मांडला होता.अखेर आरोपीस लवकरच अटक करण्याच्या आश्वासनानंतर रात्री साडे नऊ वाजणेचे सुमारास प्रेत ताब्यात घेऊन बुद्रुकवाडी येथे प्रेतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पोलीस ठाण्यात तणावाचे वातावरण
घटनेतील आरोपीला अटक करावी.यासाठी मृताच्या पत्नीसह नातेवाईक व वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी माढा पोलीस ठाण्यात व नंतर ठाण्यासमोरील रस्त्यावर ठिया मांडून घोषणाबाजी केली. या दरम्यान आरोपीचा शोध घेऊन तत्काळ अटक करण्याच्या माढा पोलीसांच्या आश्वासनानंतर निर्माण झालेले तणावाचे वातावरण निवळले.
वादात अखेर कांतीलाल यांचा गेला बळी
मयत कांतीलाल माने हे बटईने केलेल्या शेतात कष्ट करून आपला प्रपंच चालवित होते. गेल्या 10 वर्षापासून हे काम करीत असताना वारंवार अशी भांडणे झाल्याचे समजले असून याबाबत कधी आपसात तर कधी पोलीस स्टेशन मध्य हा वाद मिटवण्यात आला होता. मात्र अखेरीस या वादाने अखेरीस त्यांचा बळी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
घरातला कर्ता गेला, माने कुंटुंब आलं रस्त्यावर मयत माने यांच्या पश्चात पत्नी 2 मुली 1 मुलगा व आई असा अवलंबून असणारा परिवार आहे. मोठी मुलगी ही 16 वर्षाची असून तिन्ही मुले ही शिक्षण घेत आहेत. वयस्कर आई सहसंपूर्ण कुटुंब यामुळे उघड्यावर पडले आहे.