सोलापूर, 24 एप्रिल (हिं.स.)।
डॉ. शिरीष वळसंगकर यांनी बाथरूममध्ये स्वत:वर गोळ्या झाडल्या. पण पोलिसांना पिस्टल मात्र बेडरूममध्ये सापडले. याचा अर्थ पिस्टल कोणीतरी तेथे ठेवले. त्यावर ठेवणाऱ्याच्या बोटाचे ठसे उमटलेले असणार. पिस्टल बेडरूममध्ये आणून ठेवणाऱ्यानेच मनीषा यांचा माफीनामा तेथे ठेवला का ? असे करण्यामागे संशयाची सुई मनीषा यांच्याकडेच गेली पाहिजे असा काही हेतु होता का ? यासह अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
डॉक्टरांच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी त्यांच्या घरातून काही वस्तू जप्त केल्या होत्या. त्यात डॉक्टरांनी आत्महत्या केलेल्या बाथरूममध्ये एक जिवंत काडतूस, फायर झालेल्या गोळीची पुंगळी, टॉवेल, नॅपकिन, एका बुलेटमधील शिसे, बुलेटवरील तांब्याचे आवरण अशा वस्तू सापडल्या. पण, त्यांनी ज्या बंदुकीतून गोळी झाडली ती पिस्टल मात्र त्यांच्या बेडरुममधून जप्त करण्यात आल्याची नोंद पोलिस रेकॉर्डमध्ये आहे.
अटकेतील मनीषा यांचा माफीनामा बेडरूममधील पिस्टलजवळ आणि डॉक्टरांची चिठ्ठी मात्र त्यांच्याच खिशात सापडल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. पोलिसांना डॉक्टरांच्या बेडरुममधून पिस्टलसोबत एक पेनड्राईव्ह आणि दोन मोबाईल पण मिळून आले आहेत. पोलिसांनी अजून त्या वस्तूंचा सखोल तपास केलेला नाही. त्या वस्तू फॉरेन्सिक लॅबला पाठविल्याचे सांगण्यात आले आहे.