नवी दिल्ली , 28 एप्रिल (हिं.स.)।आयपीएलच्या ४६व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात रंगतदार लढत पाहायला मिळाली. मात्र या सामन्यात खेळाच्या जोडीला एक अनपेक्षित घटना घडली – विराट कोहली आणि केएल राहुल यांच्यात भर मैदानात वाद झाला.या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये रंगलेल्या या सामन्यात दुसऱ्या डावादरम्यान, आरसीबीच्या फलंदाजीच्या वेळी हा प्रकार घडला. कुलदीप यादव आठवी ओव्हर टाकत असताना विराट कोहली आणि दिल्लीचा विकेटकीपर केएल राहुल यांच्यात काहीसे खटके उडाले. विराट काहीतरी बोलत स्टंप्सजवळ गेला आणि केएल राहुलला हातवारे करत काही सांगताना दिसला, तर राहुल त्याचे स्पष्टीकरण देत होता.
केएल राहुलने काहीतरी म्हटले, जे विराटला मान्य नव्हते. त्यामुळे विराट त्याच्याशी थेट संवाद साधायला गेला. दोघांमध्ये काही क्षण तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. मात्र वादाचा नेमका विषय काय होता, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तरीही, मैदानावर दोन मोठ्या खेळाडूंमध्ये असा प्रसंग घडल्याने चाहत्यांमध्ये खळबळ उडाली.
या वादाच्या पार्श्वभूमीवर आरसीबीने मात्र सामन्यावर पूर्ण वर्चस्व गाजवले. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना आरसीबीसमोर १६३ धावांचे आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरादाखल, आरसीबीने केवळ ४ विकेट्स गमावत १८.३ ओव्हरमध्ये १६५ धावा करत ६ विकेट्सने शानदार विजय मिळवला.या विजयासह आरसीबीने आयपीएल २०२५ च्या गुणतालिकेत जोरदार झेप घेतली आहे. आरसीबीने १२ गुणांसह पहिले स्थान पटकावले असून, त्यांनी गुजरात टायटन्सला मागे टाकले आहे. त्यामुळे आरसीबीचे प्लेऑफ स्थान जवळजवळ निश्चित झाले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
—————