सोलापूर, 12 मे (हिं.स.)।
‘मिशन माढा : २०२९’साठी भाजपने सोलापुरात पाठविलेले पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा जिल्ह्यातील पहिलाच पॉलिटिकल स्ट्राईक सोलापूर बाजार समितीत यशस्वी झाला. या स्ट्राईकमध्ये आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची भूमिका मोलाची ठरली.
निवडणूक रणधुमाळीत पालकमंत्री गोरे यांनी माजी आमदार दिलीप माने यांच्या निवासस्थानी दिलेली भेट, महाराष्ट्र दिनादिवशी शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री गोरे व माजी आमदार माने यांची झालेली गुप्त भेट सत्कारणी लागल्याचे दिसते.
बाजार समितीसाठी माजी आमदार दिलीप माने यांच्याकडे निर्णायक संख्याबळ होते. विजय निश्चित होता. परंतु बाजार समितीच्या सत्तेला राज्यातील सत्तेची साथ मिळविण्यासाठी त्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वासू शिलेदार हवा होता. हा शिलेदार म्हणून त्यांनी त्यांचे मित्र तथा पालकमंत्री गोरे व अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची मदत घेतल्याचे दिसले. आमदार कल्याणशेट्टी यांच्यामुळे माजी आमदार माने यांना सुरेश हसापुरे यांच्याकडील मते व आमदार कल्याणशेट्टी यांच्याकडील मतांचीही साथ मिळाली.
पालकमंत्री गोरे व आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मदतीने माजी आमदार माने यांच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंतची वाट अधिक सुलभ झाल्याचे दिसले.