पंढरपूर : ‘विठ्ठल मंदिर खुलं करा,’ या मागणीसाठी पंढरपुरातील आंदोलनाप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासह एक हजारांपेक्षा जास्त जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रकाश आंबेडकर यांनी विश्व वारकरी सेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांसमवेत काल सोमवारी पंढरपुरात आंदोलन केलं. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात कोरोनाच्या अनुषंगाने लॉकडाऊन प्रतिबंधात्मक आदेश असताना प्रकाश आंबेडकर यांनी 1100 ते 1200 लोकांचा जमाव जमवला. यावेळी मास्क घातला नाही तसंच सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले नाही. संचारबंदी व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन, साथीचे रोग प्रतिबंध अधिनियमामधील तरतुदीचे उल्लंघन करुन ठिय्या आंदोलनासाठी एकत्र जमा होऊन घोषणाबाजी केली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यामुळे वंचितांचे नेते प्रकाश आंबेडकर, अरुण महाराज बुरघाटे, आनंद चंदनशिवे, धनंजय वंजारी, अशोक सोनोणे, सौ. रेखाताई ठाकूर, हभप नामद महाराज, बबन शिंदे, सागर गायकवाड, रवी सर्वगोड, गणेश महाराज शेटे आणि माऊली हळणवर या नेत्यांसह 1100 ते 1200 आंदोलकांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल परशुराम शिंदे यांनी या गुन्ह्याची फिर्याद दिली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड तपास करत आहेत.
विठ्ठल मंदिर परिसरात काल सकाळी वंचितच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. तसेच या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळालं. यावर विचारलं असता प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आम्ही फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे, मात्र कार्यकर्ते ऐकायला तयार नाहीत. यावेळी आंबेडकर यांनी एकमेकांमध्ये अंतर ठेवण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना केलं. बॅरिकेट्स तोडू नका. प्रशासनाला सहकार्य करा, एकमेकांना चिटकून उभे राहू नका, असं आंबेडकर म्हणाले. यावेळी वंचितचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी पोलिसांचं बॅरिकेट्स तोडण्याचा प्रयत्न केला.