मुंबई, २० मे, (हिं.स) : सिंगापूर, हाँगकाँगसह पूर्व आशियातील काही देशांप्रमाणेच आता भारतातही कोरोनाचा पुन्हा उद्रेक होऊ लागला आहे. मुंबईत सध्या ५३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. पुण्यातही पहिला रुग्ण आढळून आला आहे. मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा मृत्यू झाला असला तरी ते सहव्याधींमुळे झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सुदैवाने इतर कुठलाही मृत्यू झालेला नाही.
बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून खबरदारीचा उपाय म्हणून अंधेरीतील सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये २०, महिला व बालरुग्णांसाठी २० बेड्स, सामान्य लक्षणे आढळून येणाऱ्या रुग्णासाठी ६० बेड्स राखीव ठेवण्यात आले आहेत. चिंचपोकळी येथील कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये २ ICU बेड्स, १० बेड्स विशेष कोरोना वॉर्ड मध्ये ठेवण्यात आले आहेत. इतर पालिका रुग्णालयांतही कोरोना रुग्णांसाठी खास बेड्स आणि सुविधा राखून ठेवल्या आहेत.
पुण्यातही ८७ वर्षीय वृद्धाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
आरोग्य विभागाने नागरिकांना घाबरू नका, मास्क वापरा आणि गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, असा सल्ला दिला आहे. कॅन्सर, मधुमेह, वृद्ध नागरिक आणि इतर गंभीर आजारांनी त्रस्त रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोरोनाची लक्षणे : ताप, खोकला, घशात दुखणे, अंगदुखी, थकवा, चव-वास न येणे आणि श्वास घेताना त्रास हे गंभीर लक्षण मानले जाते. लक्षणांची तीव्रता व्यक्तीनुसार बदलू शकते. तात्काळ वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.
विशेष तज्ज्ञांच्या मते, सध्याचा विषाणू पूर्वीइतका धोकादायक नसला तरी खबरदारी आवश्यक आहे.
—————