औरंगाबाद : औरंगाबादमध्ये मंदिरं उघडण्याच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि एमआयएम आमनेसामने उभे ठाकले आहेत. खडकेश्वर मंदिर उघडण्यासाठी पुजाऱ्यांना निवेदन देण्याची घोषणा एमआयएमने करताच शिवसैनिकांनी खडकेश्वर मंदिराभोवती गराडा घातला. त्यामुळे शहरात तणावासारखी परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिसांच्या विनंतीवरून एमआयएमने आजचं आंदोलन स्थगित केलं आहे.
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राज्यातील सर्व धार्मिकस्थळं उघडण्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती. धार्मिकस्थळं न उघडल्यास १ तारखेला औरंगाबादमधील मंदिरातील पुजाऱ्यांना निवेदनं देण्यात येणार असल्याचंही स्पष्ट केलं होतं. त्यानुसार जलील हे आज दुपारी २ वाजता खडकेश्वर मंदिरात येऊन पुजाऱ्यांना निवेदन देणार होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मात्र, ही माहिती मिळताच शिवसेना नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि आमदार अंबादास दानवे यांनी शेकडो शिवसैनिकांसह खडकेश्वर मंदिरात धाव घेतली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक जमल्याने तणाव निर्माण झाला. त्यामुळे घटनास्थळी पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली होती. त्यामुळे पोलिसांनी इम्तियाज जलील यांच्या घरी धाव घेऊन त्यांना आजचं आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली. त्यामुळे जलील यांनी हे आंदोलन मागे घेतलं.
आज गणेश विसर्जन असून हिंदू धर्मियांचा सर्वात मोठा सण आहे. या निमित्तानं हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे मुख्यमंत्री मंदिरं सुरू करून हिंदू धर्मियांना अनोखी भेट देतील, असं मला वाटलं होतं. त्यामुळेच मंदिर आंदोलनासाठी आजचा दिवस निवडला होता, असं सांगतानाच आम्ही आंदोलनाची हाक दिल्यानंतर शिवसेना खडकेश्वर मंदिराजवळ जाऊन मंदिरं खुली करण्याची भाषा करते हे आमच्या आंदोलनाचं फलित असून एक प्रकारे आमचं आंदोलन यशस्वीच झालं आहे, असे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितलं.
“आज गणेश विसर्जन आहे. त्यामुळे पोलिसांवर बंदोबस्ताचा ताण आहे. आज आम्ही आंदोलन केल्यास कामाचा ताण वाढू शकतो. त्यामुळे आंदोलन मागे घ्या, अशी विनंती मला पोलिसांनी केली. त्यामुळे पोलिसांवर कोणताही ताण निर्माण होऊ नये म्हणून त्यांच्या विनंतीला मान देऊन आजचं आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. उद्या मात्र आम्ही मशिदीत जाणार असून मशिदी खुली करण्याचं आंदोलन स्थगित करण्यात आलेलं नाही”
इम्तियाज जलील – खासदार