अमरावती, 24 मे (हिं.स.)
पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या प्रकरणात माजी आ. बच्चू कडू आणि त्यांचे तीन सहकाऱ्यांना निर्दोष मुक्त करण्यात आले. अचलपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्णय देत दिलासा दिला आहे. निर्दोष मुक्त तीन सहकाऱ्यांमध्ये अंकुश जवंजाळ, मंगेश देशमुख वधीरज निकम यांचा समावेश आहे.
सदर प्रकरण 23 एप्रिल 2016 रोजी परतवाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आले होते. भारतीय दंड विधान कलम 353, 186, 332, 294, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. हा खटला अचलपूर येथील प्रथम वर्ग न्यायिक दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात सुरु होता. सरकारी पक्षातर्फे 15 साक्षीदार सादर करण्यात आले. या साक्षांवर आधारित न्यायालयाने चौघांनाही 6 महिन्यांची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरुद्ध बच्चू कडू यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात अपील केली. 16 मे 2025 रोजी अॅड. महेश देशमुख यांनी युक्तिवाद सादर केला.
त्यांनी कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयातील त्रुटी अधोरेखित करत साक्षीदारांच्या जबाबांतील विसंगती, पोलीस कर्मचाऱ्याचे नशेच्या स्थितीतील वर्तन आणि परिस्थितिजन्य पुराव्यांतील कमकुवतपणा यांचा उल्लेख केला. या युक्तिवादावर विचार करत जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक 2 अचलपूरचे न्यायमूर्ती आर. बी. रेहपाडे यांनी कनिष्ठ न्यायालयाचा निकाल रद्द करत चौघांनाही निर्दोष मुक्त केले. बच्चू कडू यांच्यातर्फे झालेल्या प्रभावी वकिलीसाठी अॅड. महेश देशमुख यांना अॅड. सय्यद कलीम, अॅड. आशीष देशमुख व अॅड. चैतन्य खारोडे यांची साथ लाभली.
