नवी दिल्ली , 25 मे (हिं.स.)।बांगलादेशातील राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर, बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी आता अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.युनूस यांनी दहशतवाद्यांच्या मदतीने बांगलादेशात सत्ता काबीज केली आहे. यातील अनेक दहशतवादी संघटना अशा आहेत ज्यांवर आंतरराष्ट्रीय स्तरावर बंदी आहे.” असे म्हणत शेख हसीना यांनी युनूस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये, “युनूस यांनी सत्ता हस्तगत करण्यासाठी बंदी घातलेल्या लोकांची मदत घेतली आहे, ज्यांच्यापासून आम्ही आतापर्यंत बांगलादेशच्या नागरिकांना संरक्षण देत होतो. फक्त एका दहशतवादी हल्ल्यानंतर आम्ही कठोर कारवाई केली. अनेक लोकांना अटक करण्यात आली, पण आता बांगलादेशचे तुरुंग रिकामे आहेत. युनूसने अशा सर्व लोकांना सोडले आणि आता ते दहशतवादी बांगलादेशात राज्य करतात.”असाही गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
शेख हसीना यांनी, “आपल्या महान बंगाली राष्ट्राचे संविधान हे आपण दीर्घ संघर्ष आणि मुक्ती युद्धातून साध्य केले आहे. बेकायदेशीरपणे सत्ता काबीज करणाऱ्या या अतिरेकी नेत्याला संविधानाला हात लावण्याचा अधिकार कोणी दिला? त्यांच्याकडे जनतेचा जनादेश नाही, त्यांना कोणताही संवैधानिक आधार नाही.” असेही त्यांनी म्हटले. तसेच त्यांनी, “युनूस यांना मुख्य सल्लागार पदावर राहण्याचा कोणताही आधार नाही आणि तो अस्तित्वातही नाही. अशा परिस्थितीत तो संसदेशिवाय कायदा कसा बदलू शकतो, हे बेकायदेशीर आहे. त्यांनी देशात अवामी लीगवर बंदी घातली आहे.” असेही म्हटले आहे.
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी त्यांच्या वडिलांच्या काळाची आठवण करून दिली. त्यांनी सांगितले की, जेव्हा अमेरिकेला सेंट मार्टिन बेट हवे होते तेव्हा माझे वडील शेख मुजीबुर रहमान यांनी ते मान्य केले नाही. त्याला आपले जीवन बलिदान द्यावे लागले आणि तेच माझे नशीब होते. कारण माझ्या मनात कधीच आले नव्हते की सत्तेत राहण्यासाठी देश विकला पाहिजे आणि राष्ट्रपिता बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांच्या आवाहनावर शस्त्रे उचलणाऱ्या देशातील लोकांनी ३० लाख लोकांना मुक्त करण्यासाठी लढा दिला आणि आपले प्राण अर्पण केले. त्या देशाची एक इंचही जमीन कुणाला देण्याचा हेतू कोणाचाही असू शकत नाही. पण आज युनूस बांगलादेश अमेरिकेला विकत आहे.
शेख हसीना पुढे म्हणाल्या की, “आज किती दुर्दैव आहे, अशी व्यक्ती सत्तेवर आली, ज्या व्यक्तीवर संपूर्ण देशातील लोक खूप प्रेम करतात, ज्या व्यक्तीवर संपूर्ण जग प्रेम करते आणि आज जेव्हा ती सत्तेवर आली तेव्हा त्या व्यक्तीचे काय झाले? बांगलादेशातील अंतरिम सरकार हटवण्याची तयारी सुरू आहे. लष्कर आणि बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी डिसेंबरपर्यंत निवडणुका घेण्याची मागणी करत आहेत. यावर, अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी म्हटले आहे की “जर निवडणुका घेण्यासाठी किंवा इतर कोणत्याही मुद्द्यावर त्यांच्यावर अनावश्यक दबाव आणला गेला तर ते जनतेसह प्रत्युत्तर देतील.”
