मुंबई, 3 जून (हिं.स.)।प्रसिद्ध टीव्ही अभिनेता वैभव कुमार सिंग राघव उर्फ विभु राघव याचं सोमवारी (दि.२) निधन झालं आहे. मुंबईत अभिनेत्यानं अखेरचा श्वास घेतला.तो चौथ्या टप्प्यातील कोलन कॅन्सरने ग्रासला होता. मात्र अखेर त्याची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली. अभिनेत्याच्या निधनाच्या वृत्ताला इंडस्ट्रीतील अभिनेत्याच्या काही मित्रांनी, सहकलाकारांनी दुजोरा दिला आहे.
विभू राघव गेल्या ३ वर्षांपासून कर्करोगाशी लढत होता. २०२२ मध्ये अभिनेत्याला कोलन कॅन्सरचे निदान झालं होतं. मुबईतील नानावटी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. त्यानंतर त्याने इंस्टाग्रामवर या आजाराबाबतचा त्याचा प्रवास उघडपणे शेअर केला. तो सतत आपल्या फॉलोअर्सना हेल्थ अपडेट द्यायचा. त्याचे चाहतेही त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत होते. त्यानं इंस्टाग्राम १२ एप्रिल रोजी शेवटची पोस्ट केली होती. व्हिडीओ शेअर करत त्यानं माहिती चाहत्यांना दिली होती.
विभू राघवच्या निधनानंतर त्याची मैत्रीण सिंपल कौलन हिनं इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर करत अभिनेत्याला श्रद्धांजली दिली. ती म्हणाली, “माझ्या प्रिय मित्रा, तुझी आठवण येईल. तुला प्रेम, प्रकाश आणि आनंद”. विभू राघव हा टीव्ही इंडस्ट्रीतील एक लोकप्रिय चेहरा होता. त्यानं एकापेक्षा जास्त टीव्ही शोमध्ये काम केले आहे.
यामध्ये ‘निशा और उसके कझिन्स’, ‘सुवरीन गुग्गल’, ‘रिदम’ या मालिका आणि ‘सावधान इंडिया’ सारख्या शोचा समावेश आहे.विभुच्या निधनाच्या काही दिवस आधीच अभिनेत्री सिंपल कौल, अदिती मलिक आणि इतर काही सेलिब्रिटी मित्रांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन केलं होतं. २७ मे रोजी सिंपल कौलने एक भावनिक पोस्ट शेअर करत आर्थिक मदतीचे आवाहन केले होते.