सोलापूर, 11 जून (हिं.स.)। सोलापूर जिल्ह्यात २०१९-२० मध्ये जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७९८ शाळा होत्या. सध्या दोन हजार ७७३ शाळा असून पाच वर्षांत पटसंख्येअभावी जिल्हा परिषदेच्या २५ शाळांना कुलूप लावावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर आता गुणवत्तेवर सर्वाधिक भर दिला जाणार आहे. १२ जूनपासून शिक्षकांच्या शाळापूर्व तयारीसंदर्भातील तालुकानिहाय बैठका होणार असून त्यावेळी शिक्षकांना चांगल्या वर्तणुकीचे व गुणवत्तेसंदर्भातील धडे दिले जाणार आहेत.
खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांशी स्पर्धा करताना जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या कमी होऊ लागली आहे. जिल्ह्यातील १५० हून अधिक शाळांची पटसंख्या दहापेक्षा कमी आहे. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी व पटसंख्येअभावी शिक्षक अतिरिक्त होणार नाहीत, याची खबरदारी जिल्हा परिषदेकडून घेतली जात आहे. आता इयत्ता पहिलीच्या वर्गाचा अभ्यासक्रम बदलला असून सर्व विद्यार्थ्यांची पुस्तके देखील प्राप्त झाली आहेत. पुढे २०२९ पर्यंत सर्वच वर्गाचा अभ्यासक्रम बदलणार आहे. त्याअनुषंगाने शिक्षकांनी अपडेट राहणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने जिल्हा परिषदेचा प्रयत्न राहणार आहे.