सोलापूर, 14 जून (हिं.स.)।आषाढी यात्रा सोहळ्यासाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी व जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी तसेच अन्य संतांच्या पालखी सोहळ्यासोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक सहभागी होतात. सर्व वारकरी भाविकांना पालखी मार्ग, विसावा तसेच पालखी तळांवर आवश्यक आरोग्य सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य द्यावे. वारकर्यांची आरोग्य सेवा करणे ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. वारकरी सेवा हीच पांडुरंगाची सेवा समजून प्रत्येकाने सेवाभावाच्या भावनेने कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.
पंढरपूर येथे आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर वारकरी भाविकांना देण्यात येणार्या आरोग्य सुविधेबाबतचा आढावा घेतला आणि वाखरी पालखी तळाची पाहणी केली. यावेळी मंत्री आबिटकर बोलत होते. या बैठकीस आ. समाधान आवताडे, आ. राजू खरे, सीईओ कुलदीप जंगम, डॉ. विजय कंदेवार, डॉ. संदीप सांगळे, डॉ. राधाकिशन पवार, सचिन इथापे, डॉ. सुहास माने, डॉ. संतोष नवले, डॉ. श्रीकांत कुलकर्णी, डॉ. महेश सुडके आदी उपस्थित होते.
यावेळी मंत्री आबिटकर म्हणाले की, प्रत्येक वारीत आरोग्य विभागाने चांगले काम केले आहे. या वारीतही आरोग्य विभागाने सूक्ष्म नियोजन करुन वारकरी, भाविकांना अधिकच्या सोयी-सुविधा उपलब्ध कराव्यात. साथरोग नियंत्रणाच्या दृष्टीने पालखी सर्व मार्गावरील पाणी स्त्रोतांचे सर्वेक्षण तसेच पाणी नमुने तपासणी करावी. पालखी मार्गावरील संबंधित गावातून पालखी सोहळे मार्गस्थ झाल्यानंतर त्याठिकाणची स्वच्छता करावी. तत्काळ औषध फवारणी करावी. तसेच स्थानिक नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. —————