सोलापूर, 22 जून (हिं.स.)। स्मार्ट सिटी अंतर्गत विकासकामे करण्यात आलेल्या उद्यानाचे खासगीकरण केले गेले आहे. हे काम करताना कोणत्याही लोकप्रतिनिधीला विश्वासात घेतले नाही, शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील हुतात्मा बाग आ. विजयकुमार देशमुख यांना विश्वासात न घेता भाडेतत्त्वावर खासगीकरण केल्यामुळे संतप्त झालेल्या आ. देशमुख यांनी उपायुक्त विकास लोकरे यांची कानउघडणी करत त्यांना चांगलेच झापल्याचे समजते. या संदर्भात आ. देशमुख यांना संपर्क केला असता त्यांनी या प्रकरणास दुजोरा दिला. तसेच अधिकार्यांनी महापालिका विकायला काढल्याचा आरोपही त्यांनी केला.
सोलापुरात स्मार्ट सिटी अंतर्गत कोट्यावधीची कामे करण्यात आली. सदरच्या कामांची देखभाल, दुरुस्ती प्रलंबित आहे. त्यामुळे या सर्व कामांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे शहरात स्मार्ट सिटींतर्गत विकसित केलेली आठ ठिकाणे महापालिकेने खासगी संस्थेला चालवण्यास देण्याबाबत निविदा काढली. त्यानुसार संबंधितांना वर्क ऑर्डर देखील देण्यात आल्या. मीडिया हाउस – प्रोप्रायटर आस्था मुकेश तिवारी, महंशा महिला बचत गट – अध्यक्ष सना खरादी, स्वामीनाथन नरेंद्र कल्याणशेट्टी, इम्पोरियल क्लब – शौकत पठाण, आकृती डेव्हलपर्स अँड कंन्टक्शन – अक्षय अर्जुन वाकसे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सेक्रेटरी – कमलेश पिसाळ, इंडिया प्रायव्हेट लिमिटेड – प्रोजेक्ट मॅनेजर मनोज कुलकर्णी, आतिश नामदेव कारंडे यांना या कामाचा मक्ता देण्यात आला.