मुंबई, 5 जुलै (हिं.स.)। मराठी भाषेच्या प्रश्नावरून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे बंधू एकत्र आल्याचं दृश्य आज मुंबईतील विजयी मेळाव्यात पाहायला मिळालं. या ऐतिहासिक मेळाव्यात मराठी चित्रपटसृष्टीतील काही मान्यवर कलाकारही उपस्थित होते. त्यांनी मराठीसाठी झालेल्या एकजुटीचं कौतुक करत आपल्या भावना व्यक्त केल्या. या मेळाव्यात अभिनेते भरत जाधव, सिद्धार्थ जाधव आणि अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांनी उपस्थिती लावली. त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट शब्दांत मराठीसाठी लढण्याची गरज अधोरेखित केली.
“झेंडा नाही, अजेंडा आहे” – भरत जाधव
“हा लढा आपल्यालाच लढावा लागतो हे दुर्दैव आहे. हे अपयश नाही, पण राजकारणातली गणितं समजत नाहीत. आज मला ‘झेंडा नाही, अजेंडा’ ही ओळ खूप आवडली. मराठीसाठी सर्वांनी एकत्र यावं लागेल. राजसाहेब आमच्या चित्रपटांसाठी नेहमी उभे राहतात, ते आज आवाहन करतायत, म्हणून मी इथे आलो,” असं भरत जाधव म्हणाला.
“राजसाहेबांना ऐकण्यासाठी आलोय” – सिद्धार्थ जाधव
“मराठी कलाकारांना मिळणाऱ्या स्क्रीनसाठी आपण अनेकदा आवाज उठवला आहे. पण आजचा दिवस हा त्या संघर्षाचा एक टप्पा आहे. हिंदीतही आमच्यावर प्रेम करणारे लोक आहेत, पण मराठीसाठी जेव्हा राजसाहेब बोलत आहेत, तेव्हा त्यांचं ऐकणं आवश्यक आहे. लोकांच्या उत्साहामुळे मी स्वतः उत्सुक आहे की ते काय बोलतात,” असं सिद्धार्थ जाधव म्हणाला.
“हा मराठी विरुद्ध हिंदी वाद नव्हता” – तेजस्विनी पंडित
“आज दोन भावंडं मतभेद विसरून एकत्र आली आहेत. हे महाराष्ट्रासाठी मोठं चित्र आहे. हा वाद मराठी विरुद्ध हिंदी असा नव्हता, तर सक्तीच्या विरोधात होता. सुशिक्षित लोकांना हे नक्कीच कळेल. जोपर्यंत मराठी माणसं एकत्र आहेत, तोपर्यंत कोणताही निर्णय कायम राहू शकत नाही,” असं तेजस्विनी पंडित यांनी ठामपणे सांगितलं.
या मेळाव्यामुळे मराठी भाषेच्या भवितव्यासाठी जनमानसात नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. सरकारने जीआर रद्द करून एक योग्य पाऊल उचललं असलं तरी हा लढा पुढेही सुरू राहील, असाच सूर या कलाकारांच्या भावना व्यक्त करताना दिसला.