लंडन, 3 ऑगस्ट – भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना लंडनमधील ओव्हल येथे सुरू आहे. भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी ३७४ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दिवसाच्या अखेरीस इंग्लंडने दुसऱ्या डावात एका विकेटच्या मोबदल्यात ५० धावा केल्या आहेत. बेन डकेट ४८ चेंडूत ३४ धावांवर नाबाद आहे.
भारताचा दुसरा डाव ३९६ धावांवर संपला. त्याआधी इंग्लंडचा पहिला डाव २४७ धावांवर, तर भारताचा पहिला डाव २२४ धावांवर संपला होता. त्यामुळे इंग्लंडला २३ धावांची आघाडी मिळाली होती. अंतिम विजयासाठी इंग्लंडला आता अजून ३२४ धावा कराव्या लागतील.
३७४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मोहम्मद सिराजने दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर जॅक क्रॉलीला बाद केले. क्रॉलीने ३६ चेंडूत १४ धावा केल्या. त्याने बेन डकेटसोबत पहिल्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी केली.
यशस्वी जयस्वालच्या शतकासह आकाशदीप, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने दुसऱ्या डावात ३९६ धावा उभारल्या. पहिल्या डावात पिछाडीवर असतानाही भारतीय संघाने प्रभावी पुनरागमन केले आणि इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य उभे केले.