जेरुसलेम, 3 ऑगस्ट – गाझातील हमास आणि इस्रायलमधील संघर्ष अजूनही सुरू असून, अनेक प्रयत्नांनंतरही युद्धबंदी साध्य झालेली नाही. अशात इस्रायलच्या सर्वोच्च लष्करी अधिकाऱ्याने पुन्हा एकदा गाझात हल्ले सुरू करण्याची चेतावणी दिली आहे.
इस्रायल लष्कर प्रमुख लेफ्टनंट जनरल इयाल झमीर यांनी हमासला स्पष्ट संदेश दिला आहे की, इस्रायली ओलिसांची तातडीने सुटका करावी, अन्यथा लष्करी कारवाया पुन्हा सुरू होतील. त्यांच्या म्हणण्यानुसार, पुढील काही दिवसांत ओलिस सुटकेसाठी करार होण्याची शक्यता कमी आहे, आणि गाझातील अधिकारी यामध्ये अपयशी ठरत आहेत.
इस्रायली सैन्याने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर 2023 मध्ये हमासने इस्रायलवर हल्ला करून 251 इस्रायली नागरिकांचे अपहरण केले होते. यातील 49 लोक अजूनही हमासच्या ताब्यात असून, 27 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे.
जानेवारी 2025 च्या सुरुवातीला युद्धबंदी लागू करण्यात आली होती, मात्र मार्च 2025 मध्ये हमासने उर्वरित ओलीसांची सुटका न केल्याने इस्रायलने गाझावर हल्ले पुन्हा सुरू केले. तेव्हापासून दोन्ही बाजूंमध्ये संघर्ष सुरूच आहे.
या युद्धामुळे गाझातील पॅलेस्टिनी जनतेचे जीवन विस्कळीत झाले आहे. पायाभूत सुविधा, अन्न, वीज आणि पाणी यांची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर सतत युद्धबंदीची मागणी होत आहे.