सोलापूर : क्रीडाशिक्षक प्रदीप आलाट यांच्या खून प्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवक पुत्र चेतन नागेश गायकवाड याचा जामीन अर्ज सोलापूरच्या सत्र न्यायालयाने दुसऱ्यांदा फेटाळला आहे.
यापूर्वी सोलापूर येथील सत्र न्यायालयाने चेतन गायकवाड यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर त्याने जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर त्याने पुन्हा जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. तोही अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे.
घटनेच्या दिवशी म्हणजे 19 डिसेंबर 2019 रोजी आरोपी हा घटनास्थळी नव्हता. त्याचे मोबाईल लोकेशन हे देगाव येथे मिळून आले आहे. ही बाब आरोपीच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्याला सरकारी वकिलांनी जोरदार विरोध केला. खुनाची घटना ही सलगर वस्ती परिसरात घडलेली असली तरी हे दोन्ही परिसर अगदी जवळ जवळ आहेत. मोबाईल लोकेशनमुळे परिसर समजतो मात्र निश्चित घटनास्थळ समजत नाही.
याशिवाय गंगामाई हॉस्पिटलमधील सीसीटीव्हीमध्ये आरोपींचे चित्रण झाले आहे. तसेच मृताला आयटीआयजवळून घेऊन जाताना साक्षीदारांनी पाहिले आहे. म्हणजेच या प्रकरणात नेत्र साक्षीदार व परिस्थितीजन्य पुरावा उपलब्ध आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. त्यामुळे न्यायालयाने आरोपीचा जामीन दुसऱ्यांदा फेटाळला आहे.