नवी दिल्ली : तामिळनाडूत पुढच्या वर्षाच्या सुरवातीला विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये भाजपसोबत एआयएडीएमकेची युती कायम राहील, अशी घोषणा मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांनी काल शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या चेन्नई दौर्यादरम्यान केली.
लोकसभा निवडणुकीत केलेली युती विधानसभा निवडणुकीसाठीही कायम राहील. आम्ही १० वर्षे सुशासन दिलं आहे. आमची युती २०२१ च्या निवडणुका जिंकेल. तामिळनाडू कायम पंतप्रधान मोदींना पाठिंबा देईल, असं मुख्यमंत्री पलानीस्वामी म्हणाले.
कोरोनो व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यात तामिळनाडू सरकारने केलेल्या उपाययोजनांचे अमित शहांनी कौतुक केले. तसंच केंद्राच्या क्रमवारीनुसार यावर्षी देशातील इतर राज्यांच्या तुलनेत तामिळनाडूमधील सरकार हे सर्वात चांगले आहे, असं अमित शहा म्हणाले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भारताने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखला आहे. तर जागतील बलाढ्य देशांना मात्र संघर्ष करावा लागतोय. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखल्याबद्दल मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ. पन्नेरसेल्वम यांचं शहांनी कौतुक केलं. तामिळनाडूमध्ये कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. तमिळनाडूने करोना संकटात गर्भवती महिलांची जी काळजी घेतली तेवढी इतर कुठल्याही राज्याने घेत नाही, असं शहा म्हणाले.
तामिळनाडूत ९ वर्षांहून अधिक काळापासून एआयएडीएमकेची सत्ता आहे. लोकसभा निवडणुकीत एआयएडीएमकेने डीएमकेला झटका दिला होता. आता विधानसभा निवडणुकीत डीएमकेला पुन्हा झटका देण्याची तयारी एआयएडीएमके सुरू केलीय.